अनैतिक नात्याचा दुर्दैवी अंत पाच वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


कानपूर : वारंवार लग्नाचा तगादा लावत होती म्हणून प्रियकराने सुपारी देऊन प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडली आहे.
आरोपी महिलेला स्कूटीवर बसवून स्वतः मारेकऱ्यांकडे घेऊन गेला, तेथे गोळी झाडून तिची हत्या करण्यात आली. मयत महिला आणि आरोपी गेल्या पाच वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. प्रियकरासोबत राहण्यासाठी महिला आपला पती आणि चार मुलांना सोडून आली होती. अखेर या अनैतिक नात्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.

या घटनेचा पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. घटनेचे वृत्त परिसरात पसरल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याचवेळी प्रियकराच्या कृत्यावर संताप देखील व्यक्त होत आहे.

महिला आधीपासूनच विवाहित

मयत महिला आधीच विवाहित असून, तिला चार मुलेही आहेत. पाच वर्षापूर्वी महिलेचे प्रेम केसरवानी याच्याशी प्रेमसंबंध जुळले. प्रेमसाठी सुशिला आपला पती आणि चार मुलांना सोडून आली होती. दोघे पाच वर्षे रिलेशनशीप राहत होते. आरोपी प्रेम केसरवानी हा देखील विवाहित असून त्याला एक मुलगा आहे.

वारंवार लग्नाचा तगादा लावल्याने काढला काटा

सुशिला वारंवार प्रेमकडे लग्न करण्यासाठी तगादा लावत होती. यामुळे प्रेमने तिच्या हत्येचा कट रचला. यासाठी त्याने मारेकऱ्यांना 70 हजार रुपयांची सुपारी दिली. त्यानुसार 2 डिसेंबर रोजी प्रेम स्वतः सुशिलाला स्कूटीवरुन मारेकऱ्यांकडे विधनु परिसरात घेऊन गेला.

प्रियकराच्या समोरच प्रेयसीची हत्या

तेथे सुपारी किलर राजेश आधीच उपस्थित होता. राजेशने आपल्या साथीदारासह मिळून आधी सुशिलाला जमिनीवर ढकलले. मग गोळ्या घातल्या. विशेष म्हणजे सुशिलाची हत्या करताना प्रेम तेथे हजर होता. पोलिसांनी सुशिलाच्या हत्येप्रकरणी प्रेम केसरवानी आणि सुपारी किलरला अटक केली आहे.