ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

महाराष्ट्राला जाग करणारे राज ठाकरे यांच्या भाषणातले पाच महत्त्वाचे मुद्दे.


मराठीच्या मुद्द्यावर किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या अंगावर एक तरी केस आहे का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आहे.मुंबईच्या नेस्को मैदानावर आज (27 नोव्हेंबर) आयोजित गटाध्यक्षांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केल“कोणतंही काम न करता हिंदुत्व-हिंदुत्व म्हणून जपणारे रझा अकादमीच्या मोर्चावेळी कुठे होते? या लोकांना काही देणं घेणंच नाही.

मुख्यमंत्रिपदावर असताना तब्येतीचं कारण सांगून घरी बसलेले उद्धव ठाकरे आता सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखे वागणाऱ्यातला मी नव्हे,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

 

स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि बागेत कोपऱ्यात जाऊन बसायचं, असे धंदे मी करत नाही, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या आंदोलनाबाबत नागरिकांना विस्मरण व्हावी, यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. मात्र आपल्या आंदोलनांना मिळणारं यश इतर कोणत्याही पक्षापेक्षा जास्त आहे. याची माहिती सर्व मनसे कार्यकर्त्यांना व्हावी, यासाठी एक पुस्तिका काढणार आहोत, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

 

राज ठाकरे काय म्हणाले?

 

मुंबईसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमधील गटाध्यक्षांचा मेळावा घेण्याचा विचार आहे. त्याची सुरुवात मुंबईपासून करण्यात आली आहे.

 

निवडणुकांमध्ये प्रत्येक गटाध्यक्ष हा राज ठाकरे असतो.

 

निवडणुका वर्षभरापासून लांबणीवर पडल्या आहेत. येत्या फेब्रुवारीमध्ये लागतील, असं म्हटलं जात आहे. पण वातावरण पाहून अजूनही त्या होतील की नाही, माहीत नाही.

 

पण त्या निवडणुका लागतील, असं गृहित धरून त्याची तयारी म्हणून हे मार्गदर्शन केलं जात आहे.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन करून 16-17 वर्षे झाली. या कालावधीत पक्ष म्हणून आपण ज्या-ज्या भूमिका घेतल्या, त्या भूमिकांचं स्ट्राईक रेट सर्वाधिक आहे. आपल्याला इतर कोणत्याही पक्षांपेक्षा जास्त यश मिळालेलं आहे.

 

मात्र, आपल्याकडून केली जाणारी आंदोलने लोकांच्या विस्मरणात कशी जातील, यासाठी यंत्रणा कार्यरत आहेत.

 

1. मनसेच्या आंदोलनांवर पुस्तिका

 

आपल्या टोलच्या आंदोलनानंतर 65 ते 67 टोल नाके बंद झाले आहेत. ज्यांनी टोल नाके बंद करू असं निवडणुकांच्या तोंडावर सांगितलं, त्यांना कोणतेही प्रश्न विचारले जात नाही.

 

गेल्या 16-17 वर्षांत आपण केलेल्या आंदोलनांवर मी एक पुस्तिका काढणार आहे.

 

आपलं रेल्वेचं आंदोलन उत्तर प्रदेश-बिहारच्या लोकांविरुद्ध नव्हतं. तर ते उमेदवारांविरुद्धचं आंदोलन होतं.

 

रेल्वे भरतीच्या जाहिराती या महाराष्ट्रात न देता उत्तर प्रदेश बिहारमध्ये दिल्यामुळेच हे आंदोलन करण्यात आलं होतं.

 

या भरतीबाबत महाराष्ट्रात कुणालाच काही कल्पना नव्हती. चौकशीदरम्यान एका उमेदवाराने आईवरती शिवी दिल्यामुळेच त्याला मारहाण केली गेली.

 

आपल्या रेल्वेच्या आंदोलनामुळे हजारो मराठी मुला-मुलींना नोकऱ्या मिळाल्या. उत्तर पत्रिका मराठीतून मिळायला सुरुवात झाली.

 

कोणत्याही राज्यात अशा नोकऱ्या उपलब्ध होणार असतील, तर त्या-त्या राज्यातल्या तरुणांना मिळाल्या पाहिजेत.

 

 

2. उद्धव ठाकरे कधीच कोणती भूमिका घेत नाहीत

 

मराठीच्या मुद्द्यावर किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या अंगावर एक तरी केस आहे का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आहे.

 

एकनाथ शिंदेंनी रात्रीत कांडी फिरवली आणि हे घराबाहेर पडले. उद्धव ठाकरे यांनी कधीच कोणती भूमिका घेतली नाही.

 

पाकिस्तानी कलावंत इथे धुडगूस घातल होते, तेव्हा त्यांना लाथा घालून मनसे कार्यकर्त्यांनीच हाकलून दिलं. परत कधी पाकिस्तानी कलावंत भारतात आले नाहीत.

 

राज ठाकरे आधीपासूनच हिंदुत्ववादी होते. एका कट्टर हिंदुत्ववादी आणि मराठी घरात माझा जन्म झाला आहे.

 

या सगळ्या गोष्टी लोकांना विसरण्यास लावलं जात आहे. त्यासाठीच या सगळ्या यंत्रणा चालतात.

 

मशिदीवरचे भोंगे उतरवले पाहिजेत, असं बाळासाहेब आजपर्यंत जी गोष्ट बोलत होते. तीच इच्छा आपण पूर्ण केली.

 

आपण भोंगे काढायला सांगितले नाहीत. तर समोर हनुमान चालीसा लावू, असं आपण म्हटलं.

 

अजूनही काही ठिकाणी भोंगे सुरू आहेत. जिथे ते सुरू आहेत, तिथे पोलिसांत तक्रार दाखल करायची. त्यांनी तक्रार दाखल करून घेतली नाही, तर त्यांच्यावर न्यायालयाच्या अवमानाची केस दाखल होऊ शकते.

 

त्यामुळे पहिल्यांदा पोलिसांना जाऊन भेटा, त्यांच्याकडून काहीही झालं नाही, तर मोठ्या ट्रकवर मोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा वाजवा, त्याशिवाय ते वठणीवर येणार नाहीत. जोपर्यंत अरे ला कारे होत नाही, तोपर्यंत हे असंच राहणार.

 

 

3. राज्यपाल असल्याने कोश्यारींचा मान राखतो

 

महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर जात आहेत. मी 2014 ला तेच म्हटलं होतं. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार झारखंडवर लक्ष केंद्रीत करावं.

 

आज 2 प्रकल्प बाहेर जातात. गुजरातमध्ये जातात याचं वाईट वाटत नाही. ज्या राज्यांमध्ये मागासलेपण आहे, तिथे जाऊ देत.

 

भारतातलं प्रत्येक राज्य प्रगत होतो, तसा देश प्रगत होतो. देश हा सर्व राज्यांचा समूह आहे. त्यामुळे तुम्ही गुजरात-गुजरात करू नका, अशी माझी नरेंद्र मोदींकडून अपेक्षा होती. प्रत्येक राज्य हे देशाचं अपत्य आहे, त्यांच्याकडे समान पद्धतीने बघणं गरजेचं आहे. हीच आपली धारणा होती, आहे आणि राहील.

 

कोश्यारींचं वय काय ते काय बोलत आहेत? ते राज्यपाल पदावर बसलेले आहेत, म्हणून मान राखतोय, अन्यथा महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही.

 

इथले मारवाडी-गुजराती परत गेले तर काय होईल, असं त्यांनी म्हटलं होतं. कोश्यारीजी, तुम्ही पहिल्यांदा मारवाडी-गुजराती समाजाला विचारा की तुम्ही तुमचं राज्य सोडून महाराष्ट्रात का आलात?

 

तुम्ही उद्योगपती, व्यापारी आहात, तर मग तुमच्या राज्यात उद्योग का नाही केला. कारण उद्योगासाठी महाराष्ट्रासारखी सुपीक जमीन नव्हती. महाराष्ट्र हा मोठाच होता आणि मोठाच आहे.

 

महाराष्ट्र काय आहे, हे आम्हाला कोश्यारी यांच्याकडून ऐकायचं नाही. आज जर आपण मारवाडी-गुजराती समाजाला सांगितलं की परत जा, तर ते जातील का?

 

आजही परदेशातील कोणताही प्रकल्प देशात येणार असेल, तर त्यांचं पहिलं प्राधान्य महाराष्ट्राला असतं.

 

4. अब्दुल सत्तार यांच्यावर टीका

 

हल्ली कुणीही येतं काहीही बरळतं. राजकीय पक्षांचे प्रवक्ते टीव्हीवर काहीही बोलत असतात. मी असा महाराष्ट्र आजपर्यंत कधीही पाहिला नाही.

 

एक मंत्री महाराष्ट्रातील एका महिला नेत्याला काहीही बोलतो, इथपर्यंत पातळी गेली आहे.

 

त्यांची भाषा काय असते, त्यांना वाटतं की आपण विनोद करत असतो. काही प्रवक्ते बोन्साय झाडाप्रमाणे असतात. पण मोठ्या गोष्टी करतात.

 

आता कॉलेजमध्ये असलेले तरूण मुलं-मुली हे सगळं पाहत असतील. हे म्हणजेच राजकारण असा त्यांचा समज होईल. संतांनी आपल्यावर हेच संस्कार केले आहेत का?

 

तरुण विद्यार्थी देशाबाहेर जाण्याविषयी बोलत आहेत, हे योग्य नाही, असं ते म्हणाले.

 

 

5. सावरकरांची माफी ही रणनिती

 

राहुल गांधींचा म्हैसूर सँडल सोप असा उल्लेख करत राज ठाकरेंनी त्यांच्यावर निशाणा साधला.

 

सावरकर कोण आहेत, त्यांना कुठे ठेवलं होतं, त्यांनी काय हाल-अपेष्टा सहन केल्या ते राहुल गांधींना माहीत आहे का?

 

सावरकर यांनी माफी मागितली असं ते म्हणतात, पण रणनिती नावाची एक गोष्ट असते. त्याचा आम्ही कधी विचार करणार नाही. आम्ही फक्त दयेचा अर्ज पाहणार.

 

सर सलामत तो पगडी पचास. 50 वर्षे शिक्षा झालेला एक माणूस आतमध्ये सडत बसण्यापेक्षा यांच्याशी खोटे बोलून बाहेर तरी येतो, याला स्ट्रॅटेजी म्हणतात.

 

एखादी चांगली गोष्ट घडणार असेल आणि त्यासाठी खोटं बोलावं लागत असेल, तर बोला, असं आमची कृष्णनिती आम्हाला सांगते.

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग यांना गडकिल्ले दिले, ती काय चितळ्यांची बर्फी होती का? त्यावेळची परिस्थितीच तशी होती. मावळे थकलेले होते. आर्थिक अडचणी होत्या. आलेल्या सैन्याला परत तोंड देणं शक्य नव्हतं. गडकिल्ले फक्त लिहून द्यायचे ते कुठेच जाणार नाहीत, ही रणनिती असते. ही रणनिती समजत नाही, तो गुळगुळीत मेंदूचा आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button