दसऱ्याच्या सणाला चारचाकी गाडी घेण्यासाठी बेदम मारहाण करुण पती कडून छळ

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


औरंगाबाद : दोन वर्षांपुर्वी लग्न झालेल्या अभियंता विवाहितेचा परदेशात नेऊन पतीने छळ केला.
त्यानंतर अचानकपणे मायदेशी परत आणून पासपोर्टसह इतर कागदपत्रे काढून घेतली. दसऱ्याच्या सणाला चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून ७ लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. ती पूर्ण झाली नसल्यामुळे बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरुन नवऱ्यासह सात जणांच्या विरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

अभियंता असलेल्या विवाहितेचा ३ ऑगस्ट २०२० रोजी अमोल नामदेव आढावे (रा. सह्याद्रीनगर, सातारा परिसर) याच्यासोबत नोदंणी पद्धतीने विवाह झाला होता. सुरुवातीचे काही दिवस चांगले वागविल्यानंतर सासरच्यांनी माहेरहुन घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी मागणी केली. मुलीला त्रास होऊ नये म्हणुन विवाहितेच्या वडिलांनी काही रक्कम दिली. त्यानंतरही मारहाणीसह मानसिक त्रास सुरुच राहिला. अमोल आढावे याला कंपनीमार्फत सिंगापुरला जाण्याची संधी मिळाली. तेव्हा त्याने विवाहितेलाही नौकरीचा राजीनामा देण्यास भाग पाडून सोबत नेले. त्याठिकाणीही अताेनात छळ सुरुच ठेवला. २८ सप्टेंबर रोजी अचानकपणे मायदेशी परत आणले.
तसेच दसरा सणानिमित्त चारचाकी गाडी घ्यायची असल्यामुळे पैसे आणण्यासाठी दुसऱ्याच दिवशी माहेरला पाठवुन दिले. त्यानंतर चार दिवसांनी वडील विवाहितेला घेऊन सासरी गेले.

सासरच्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाच अपमानित केले. त्यामुळे विवाहितेला सासरी सोडून वडील परत गेल्यानंतर नवरा अमोल याच्यासह सासरा नामदेव, दीर राहुल, नंदोई सिद्धार्थ जमधडे यांच्यासह सासु, जाऊ आणि नणंदेने बेदम मारहाण केली. ११२ वर मदतीसाठी संपर्क साधला असता मोबाईल काढून घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सातारा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सोडवणूक करीत ठाण्यात आणले. त्याठिकाणी मेडिकल मेमो देऊन आई-वडिलांच्या ताब्यात सोपविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक शंकर शिरसाठ करीत आहेत.