ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रमुंबईराजकीय

सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये जोरदार राडा कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ


विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज अभूतपूर्व असा गोंधळ घडला आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.
यावेळी हाऊस सुरु होण्याआधी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. यावेळी शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं. महाराष्ट्रात एकीकडे शेतकरी अडचणीत आहे. अनेक प्रश्न आ वासून राज्यासमोर उभे आहेत. असं असताना लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात पाठवलेल्या या प्रतिनिधींकडून अशी कृती निश्चितच लाजिरवाणे असल्याचं बोललं जात आहे.
विधान भवनाच्या पायऱ्यांवर राडा झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे तक्रार केली आहे. सुरुवातीला महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार अमोल मिटकरी यांनी केली आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर अमोल मिटकरी आणि महेश शिंदे एकमेकांमध्ये भिडले होते. मिटकरी यांनी सत्ताधारी आमदारांनी धमकावलं असल्याचं देखील म्हटलं आहे.
गोंधळ घडला त्यावेळी तिथं उपस्थित असणारे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले की, आमच्यावर विरोधक आरोप करत होते. आता आम्ही त्यांच्या भ्रष्टाचारावर आवाज उठवण्यासाठी पायऱ्यावर आंदोलन केलं. आम्ही कुणाला पाय लावत नाही. आम्हाला कुणी पाय लावत असेल तर आम्ही सोडणार नाही. कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ, असं ते म्हणाले. आम्ही कुणाच्या आत जात नाहीत, आमच्या आत कुणी येऊ नये, असं गोगावले म्हणाले. आमच्या मार्गात आलं तर आम्ही सोडणार नाही, असं ते म्हणाले. त्यांनी आम्हाला धक्काबुक्की नाही केली, आम्ही त्यांना धक्काबुक्की केली, असंही गोगावले म्हणाले. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आम्ही डरफोक नाहीत, असं ते म्हणाले.



आमदार दिलीप लांडे म्हणाले की, आम्ही लोकांसमोर वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न लोकशाही पद्धतीनं करत होतो. खरी परिस्थिती आम्ही लोकांसमोर ठेवत होतो. त्यांचे कपडे उतरले जात होते, ते त्यांना नको होतं, त्यामुळं त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, असं लांडे यांनी म्हटलं. यात कुणीही कुणाला धमकावलेलं नाही, विरोधकांप्रमाणे आम्हालाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळं जो कुणी अंगावर येईल, त्याला शिंगावर घेतलं जाईलच, असं ते म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button