नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


नागपूर; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आगामी पंचवीस वर्षांचे नियोजन करून बलशाली महाराष्ट्र निर्मितीचा संकल्प करु या, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्यांक, ओबीसी, शेतकरी, महिला, विद्यार्थी, कामगार इत्यादी समाज घटकांना सोबत घेऊन आमची वाटचाल असेल. नागपूरच्या विकासासाठीही राज्य सरकार कटिबद्ध आहे. आता आपण नागपूर बदलत असल्याचा अनुभव घेत आहोत. मेट्रोपासून अनेक पायाभूत सुविधांचा विकास सर्वांपुढे आहे. मात्र या विकासातून प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक बदल झाला पाहिजे,
अतिवृष्टीमुळे सध्या शेतकरी त्रस्त आहे. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) दुप्पट मदत जाहीर केली आहे. पायाभूत सुविधांची उभारणी, दुरुस्ती, जनावरांच्या नुकसानीसाठीही मदत केली जाईल. महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी काम करताना विदर्भाच्या विकासाकडे अधिक लक्ष दिले जाईल. विदर्भातील उद्योगांना वीज सबसिडी दिली जाईल. या ठिकाणी गुंतवणूक वाढावी यासाठी प्रयत्न केले जातील. नागपूर हे ‘एज्युकेशन हब’ होत आहे. दर्जेदार शिक्षणाचे केंद्र होत आहे. शिक्षण दर्जेदार असेल तर उत्तम कौशल्ययुक्त मनुष्यबळ निर्माण होईल. उद्योग व्यवसाय येतील. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. नागपुरातील तरुणांच्या हाताला काम मिळेल. यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.