शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?
अस्ट्राझेनेका या ब्रिटिश फार्मास्युटिकल्स कंपनीने कोर्टामध्ये कोविशिल्ड लशीच्या दुष्परिणामांबद्दल कबुली दिली आहे. साईड इफेक्टमुळे होणाऱ्या आजारांना थ्रोम्बोसाईटोपेनिया सिंड्रोम (TTS) यासह थ्रोम्बसिस या नावाने ओळखलं जातं.
कंपनीच्या विरुद्ध ब्रिटिश कोर्टात एक केस सुरु आहे. ज्यामध्ये कंपनीने कोविशिल्डच्या साईड इफेक्टबद्दल कबुली दिली आहे. कंपनीवर आरोप आहे की, त्यांच्या व्हॅक्सिनमुळे माणसाला गंभीर नुकसान किंबहूना मृत्यूदेखील येऊ शकतो.
कोर्टातील कागदपत्रांनुसार, अस्ट्राझेनेका आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने कोविशिल्ड व्हॅक्सिनला विकसित केलं आहे. शिवाय सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या वतीने ही व्हॅक्सिन बनवण्यात आलेली आहे. या लशीमुळे क्वचित प्रसंगांमध्ये TTS आजार होऊ शकतो.
कोरोना महामारीमध्ये भारतात कोट्यवधी लोकांना ही लस टोचण्यात आलेली आहे. त्यामुळे कंपनीने कोर्टात केलेल्या दाव्यांमुळे सगळ्यांचीच झोप उडाली आहे. थ्रोम्बोसाईटोपेनिया सिंड्रोम म्हणजेच थ्रोम्बोसिसमुळ दुर्मिळ परिस्थितीत आजार होऊ शकतो. यामुळे शरीरात वेगवेगळ्या ठिकाणांवर रक्ताच्या गाठी तयार होतात आणि रक्तातल्या प्लेटलेट्ची संख्या कमी होते. अशी परिस्थिती उद्भवणं गंभीर ठरू शकतं. मेंदूसह हृदयावर यामुळे दुष्परिणाम होण्याचा धोका आहे.
कसा होतो टीटीएस?
टीटीएसची लक्षणं त्याच लोकांमध्ये आढळून येत आहेत, ज्यांनी वॅक्सजवेरिया, कोविशिल्ड आणि जॉन्सन अँड जॉन्सन कोविड व्हॅक्सिन प्रमाणे एडेनोव्हायरल वेक्टरचे डोस घेतले होते. टीटीएस हा दोन टियरमध्ये होतो.
टियर वनमध्ये मेंदू किंवा आतड्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. कधीकधी पाय किंवा फुफ्फुसांमध्येही रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. हा प्रकार अधिक गंभीर आणि धोकादायक असतो.
टियर दोनमध्ये पाय किंवा फुफ्फुसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. प्लेटलेट्स सतत घटत जातात. त्यासाठी अँटी पीएफ-४ एलिसा चाचणी गरजेची असते.