क्राईम

बहिणीच्या संसारालाच सुरुंग,पाहुणी म्हणून आली अन् गर्भवती झाली..


नागपूर : मोठ्या बहिणीच्या घरी पाहुणी म्हणून आलेल्या मेहुणीचा जीव भाऊजीवर जडला. काही दिवसांत दोघांचे सूत जुळले त्यातून ती गर्भवती झाली. ती भाऊजीसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायला लागली.



मात्र, बाळ झाल्यानंतर प्रकार उघडकीस आला. दोन सख्ख्या बहिणींच्या संसाराचा वाद असल्यामुळे भरोसा सेलने समूपदेशन करून तिढा सोडवला.

उत्तरप्रदेशचा युवक रणबीर नागपुरात आला आणि वाडीत ट्रक वाहतूकदार बनला. लाखांमध्ये कमाई असल्याने त्याने नागपुरात स्वतःचे घर आणि बरीच संपत्ती विकत घेतली. त्याचे लग्न उत्तरप्रदेशातील एका सधन कुटुंबियातील तरुणी दीपिका (काल्पनिक नाव) हिच्याशी झाले. त्याने वाडीत संसार थाटला. पत्नी, मुलगा व मुलगी असा संसाराचा गाडा हाकत होता.

यादरम्यान, पदवीची परीक्षा संपल्यानंतर उन्हाळ्यात त्याची मेहुणी मृणाली (काल्पनिक नाव) ही बहिणीकडे पाहुणी म्हणून आली. बहिणीवर जीवापाड प्रेम करणारा आणि लाखांमध्ये कमाई करणारा भाऊजी हा मेहुणी मृणालीला आवडायला लागला. दोघांमध्ये सूत जुळले आणि अलगद दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. बहिणीच्या सुखी संसाराची पर्वा न करता मृणालीने भाऊजीला जाळ्यात ओढले. त्यानंतर दर दोन महिन्यांनी मृणाली नागपुरात बहिणीकडे यायला लागली. मात्र, साध्या स्वभावाच्या बहिणीच्या मनात पतीबाबत कोणतीही शंका आली नाही.

दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नात्यातील गुंता वाढत गेला. मृणालीला बघायला पाहुणे आल्यानंतर ती थेट लग्नास नकार द्यायची. त्यामुळे कुटुंबियांनीही वरसंशोधन करणे बंद केले. काही दिवसांत ती घरातून अचानक बेपत्ता झाली. तिचा थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे पोलिसांत तक्रार आणि शोधाशोध झाली. बहिणीसह सर्वच कुटुंब चिंतेत होते. मात्र, वर्ष उलटले तरीही तिचा शोध लागला नाही.

घराचे बांधकाम सुरु केल्याने रणबीरने कुटुंब हॉटेलमध्ये ठेवले. मात्र, पत्नी दिपीकाने स्वतःच्या फ्लॅटवर राहण्याचा हट्ट धरला. दोघांत वाद झाल्यामुळे दिपीकाने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. पोलिसांनी मनधरणी करून फ्लॅटवर नेले. तेथे सख्खी बहीण मृणाली चिमुकल्या बाळासह दिसली. बहिणीच्या पायाखालची माती सरकली. तिने सर्व कुटुंबियांना पतीच्या कारनाम्याची माहिती दिली. कुटुंबीय आले आणि वाद विकोपाला गेला.

मृणाली गर्भवती झाल्यानंतर तिला फ्लॅटमध्ये ठेवले आणि तिच्यासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत असल्याची कबुली रणबीरने दिली. दीपिकाने पती व बहिणीविरुद्ध भरोसा सेलमध्ये तक्रार केली. तिघांनाही तेथे बोलविण्यात आले. मृणालीने बाळासह आत्महत्या करण्याचा पवित्रा घेतला. पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे आणि समूपदेशक प्रेमलता पाटील यांनी तिघांचीही समजूत घातली. शेवटी मोठ्या बहिणीने सामंजस्य दाखवत पतीची सर्व संपत्ती नावे करून देण्याची अट ठेवली. रणबीर आणि मृणालीने ती मान्य केली. त्यानंतर दोघीही बहिणी एकाच घरात नांदायला तयार झाल्या. अशाप्रकारे उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर असलेला त्रिकोणी संसार पुन्हा थाटला गेला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button