त्यांच्यासोबत एकही सच्चा शिवसैनिक नाही – उद्धव ठाकरे

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


ज्या दगडांना शिवसेनेने शेंदूर फासला तेच आज शिवसेना गिळायला निघाले आहेत. भाजपच याचा कर्ता करविता आहे. या कळसूत्री बाहुल्यांचे संचालक तेच आहेत.
त्यामुळे ही बंडखोरी नाही तर नमकहरामी आहे. या बंडखोरांनी माझ्या वडिलांचा, शिवसेनाप्रमुखांचा फोटो लावू नये. स्वतःच्या आई-वडिलांना घेऊन सभा घ्याव्यात, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. रविवारी सायंकाळी अभ्युदयनगर येथील शिवसेना कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी उपस्थित होते.

शिवसेना फोडण्याचे प्रयत्न यापूर्वी अनेकदा झाले. मात्र, सध्या जे सुरू आहे तो शिवसेना संपविण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांना ठाकरे आणि शिवसेना हे नाते तोडायचे आहे. मात्र, हे नाते घट्ट आहे. त्यांच्या कितीही पिढ्या खाली आल्या तरी त्यांना पाताळात गाडून हे नाते कायम ठेवू, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. फुटून गेलेल्यांनी विनंती केली की, आम्हाला गद्दार बोलू नका. आम्ही नाही बोलत. पण तुम्ही तुमच्या कपाळावर स्वतःच्या हाताने शिक्का मारून घेतलाय, तोच बोलतोय. जे गेले आहेत, त्यांच्यासोबत एकही सच्चा शिवसैनिक नाही, असेही ठाकरे म्हणाले.

2019 साली भाजपसोबत सर्व करार ठरले होते. त्यानंतर लोकसभा निवडणूक झाली. आपलेही खासदार निवडून आले आणि भाजपची तर एकहाती सत्ता आली. पण जे खाते नको म्हटले होते तेच गळ्यात मारले गेले. आता शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले म्हणणार्‍यांना तेव्हा मी हेच सांगत होतो. तेव्हाच केले असते तर आज मनावर दगड ठेवत हा निर्णय घ्यावा लागला नसता, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.