महत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

“दोन लोक एकमेकांशी भांडतात, गोळीबार करतात,त्यात देवेंद्र फडणवीस काय करू शकतात? – छगन भुजबळ


भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.

याप्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उल्हासनगर गोळीबार प्रकरणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे. त्यावर छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले. “दोन लोक एकमेकांशी भांडतात, गोळीबार करतात, त्यांचे वैयक्तिक भांडण असते, त्यात देवेंद्र फडणवीस काय करू शकतात?”, असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.

माध्यमांशी बोलत असताना छगन भुजबळ म्हणाले, “मी काल टीव्हीवर ही बातमी पाहिली, तेव्हाच मला आश्चर्य वाटलं. हे कशामुळं झालं, त्यांच्यामध्ये एवढा संताप का होता? याची माहिती समोर आलेली नाही. जे जखमी झाले आहेत, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. मी आताच या प्रकरणावर अधिक काही बोलणार नाही, कारण सत्यपरिस्थिती पाहावी लागेल. नाहीतर आंतरवाली सराटी सारखे होईल. आंतरवाली सराटीमध्ये असेच झाले होते. आधी तिथे दगडफेक झाली, ८० जण जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पण सर्वांसमोर पहिला भाग आलाच नाही, दुसरा भागच आला. त्यामुळे उल्हासनगरच्या प्रकरणात नेमकं काय घडलं, हे पाहावं लागेल. प्रत्यक्षदर्शी लोक याबाबत अधिक माहिती देऊ शकतील.”

सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर भुजबळ यांनी सुप्रिया सुळेंवरच टीका केली. “फडणवीस यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. फडणवीस यांनी गोळीबार करण्यासाठी सांगितलेले नाही. उल्हासनगर प्रकरणात दोन लोकांचे वैयक्तिक भांडण होते, असे दिसत आहे. वैयक्तिक भांडणातून असे गुन्हे घडत असतात. मलाही एक आमदार किती शिव्या घालतो, घाणघाण बोलतो, मारायची-कापायची भाषा वापरतो. त्याला फडणवीस काय करणार? फडणवीस एवढेच करू शकतात की, काही झाल्यानंतर कायद्यानुसार कारवाई करू शकतात”, अशी उपरोधिक टीका छगन भुजबळ यांनी केली.

दरम्यान उल्हासनगर गोळीबारावर बोलत असताना सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला होता. “मी या घटनेचा निषेध करते. राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. ज्याने कुणी गोळीबार केला त्यांना कडक शिक्षा व्हावी. या घटनेमागे काहीही कारण असले तरी गोळीबार करण्याचा अधिकार कुणालाही नाही. पोलिसांच्या समोरच जर गोळीबार होत असेल तर ही सत्तेची मस्ती नाहीतर काय आहे?”, असा उद्विग्न सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button