120 फूट लांब विठ्ठलाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


हिंजवडी : मुळशीतील वातुंडे गावातील एका शेतकऱ्याने चक्क विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिकृती साकारली आहे. तीही भातरोपाची अनोखी पेरणी करून. शेतात भात रोपांची अनोखी हिरवीगार 120 फूट लांब विठ्ठलाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे.

लक्ष्मी व बाळकृष्ण शिंदे या शेतकरी दाम्पत्यांनी पंढरीची वारी सुरू असतानाच ही भात रोपांची नक्षीदार मूर्ती साकारल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.विठ्ठलाचे रूप पहाण्यासाठी पिंपरी चिंचवड तसेच पुण्यातून भाविकांची व पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. या शेतातील हिरव्या विठ्ठलमूर्तीच्या प्रतिकृतीचे व संकल्पनेचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

संत सावता महाराजांच्या व सकल संतांच्या विचारधारेप्रमाणे त्यांनी आपल्या कर्मात देव शोधला. संत सावता महाराज म्हणतात,
“कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माजी।।’ या उक्‍तीप्रमाणे बाळकृष्ण शिंदे यांनी आपल्या शेतामध्ये व कर्मातच विठ्ठल शोधला आहे. त्यांनी आपल्या शेतात 120 फूट लांब आणि 60 फूट रूंद उंचीचा पांडुरंग रूपी भातपीक उगवून आले आहे. महिन्यापूर्वी शेतात बियाणे टाकून दाढ केली. भाताचे बी विठ्ठलरूपी फक्कीने काढलेल्या डिझाईनमध्ये तंतोतंत पेरले, पाऊस होताच आता हा पेरलेला विठ्ठल लक्षवेधी ठरला आहे.

मुठा नदीच्या तीरावरील वातुंडे गावातील निसर्गरम्य परिसरात लक्ष्मी बाळकृष्ण शिंदे यांनी यंदा 20 गुंठे जमिनीत साकारलेला भात पिकाचा विठ्ठल पहाण्यासाठी पंचक्रोशीतून लोक येत आहेत. सिव्हिल इंजिनिअर असलेल्या बाळकृष्ण शिंदे यांनी सुरुवातीला ऍटोकॅडमध्ये डिझाईन तयार केले. ते जमिनीवर रेखाटून त्यावर फक्की टाकली. त्यामध्ये भाताची रोपांची विठ्ठलरूपी पेरणी केली. आता पाऊस सुरू झाल्याने या हिरवागार व नक्षीदार विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.