ताज्या बातम्यामहत्वाचे

नरेंद्र मोदी आज MP-CG च्या दौऱ्यावर, 57000 कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी होणार!


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेश आणि छत्तीसगड दौऱ्यावर आहेत. या दोन्ही राज्यांना कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची भेट दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर (ट्विटर) ट्विट करून आपल्या दौऱ्याची माहिती दिली.



पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11:15 वाजता मध्य प्रदेशातील बिना येथे पोहोचतील आणि 50,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी करतील.

या प्रकल्पांमध्ये बीना रिफायनरी येथील पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स आणि राज्यभरातील 10 नवीन औद्योगिक प्रकल्पांचा समावेश आहे.यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 2:15 वाजता छत्तीसगडमधील रायगडमधील जिंदाल विमानतळावर हवाई दलाच्या विशेष विमानाने उतरतील. तेथून हेलिकॉप्टरने कोडत्राई येथे पोहोचतील. दरम्यान, छत्तीसगडमध्ये सुमारे 6,350 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.

नरेंद्र मोदींनी बुधवारी ट्विट केले आहे. यामध्ये लिहिले की, ‘मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील माझ्या कुटुंबीयांसाठी उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. दोन्ही राज्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार सातत्याने कटिबद्धतेने काम करत आहे. यादरम्यान, उद्या अनेक मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्याचे सौभाग्य आपल्याला मिळणार आहे. यामुळे येथील लोकांच्या जीवनात सुख-समृद्धीची नवी दारे खुली होतील.

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तीसगडमधील नऊ जिल्ह्यांमध्ये ‘क्रिटिकल केअर ब्लॉक’ची पायाभरणी करतील आणि एक लाख सिकल सेल काउंसिलिंग कार्डचे वितरणही करतील. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रायगड, छत्तीसगडमध्ये कोळसा-ऊर्जा-आरोग्य आणि रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. यावेळी पंतप्रधान रायगडमध्ये जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत मध्य प्रदेश निवडणुकीसाठी जवळपास 35 जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपला या सर्व जागांवर पराभवाचा सामना करावा लागला होता. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरच्या मध्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button