चांदणी चौकाचे स्टार उजळले, सेवा रस्त्याचे कधी? नागरिकांचा सवाल
बाणेर(पुणे) : ‘चांदणी चौकाचे स्टार उजळले’, असे बॅनर तेथील उड्डाणपुलाच्या उद्घाटनानिमित्ताने शहरात नुकतेच झळकले. या पार्श्वभूमीवर बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी परिसरातील सर्व्हिस रोडचे (सेवा रस्ता) ‘स्टार’ कधी उजळणार, असा प्रश्न उपस्थित करीत नागरिकांनी या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले आहे.
या रस्त्यावर सध्या ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सेवा रस्त्यांच्या देखभाल, दुरुस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केले जात असल्याचे सांगण्यात येते.
परंतु, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी परिसरातील सेवा रस्त्याची देखभाल, दुरुस्ती मात्र होत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. या भागातील नागरिक महामार्गालगत असलेल्या सेवा रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. मात्र, या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. यामुळे बाणेर येथील किया शोरूम ते सूस खिंड परिसरात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असून, वाहनचालक व नागरिकांना कसरत करावी लागत आहे. तसेच इतर ठिकाणीही खड्डे पडले असून, या रस्त्याची दुरुस्ती होणार तरी कधी, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे.
चांदणी चौकातील लखलखीत उड्डाणपुलाचे शनिवारी उद्घाटन झाले. यानिमित्ताने शहरात ‘चांदणी चौकाचे स्टार उजळले’, या आशयाचे फलकही झळकले. मात्र, बाणेर, बालेवाडी परिसरातील सेवा रस्त्याच्या दुरवस्थेचे काय, असा प्रश्न उपस्थित करीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याकडेही लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दुरुस्तीबाबत समन्वयाचा अभाव
काही सेवा रस्त्यांची दुरुस्ती महापालिका करते, तर काही रस्त्यांचे काम महामार्ग प्राधिकरणाकडून केले जाते. मात्र, दोन्ही प्रशासनांमध्ये या सेवा रस्त्याच्या दुरुस्तीबाबत समन्वयाचा अभाव जाणवत आहे, यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले की, हा सेवा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येत असल्याने त्यांची दुरुस्ती त्यांच्याकडून होणे अपेक्षित आहे. तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांशी याबाबत संपर्क साधला तो होऊ शकला नाही.