ताज्या बातम्या

महाराष्ट्रात टोमॅटोच्या दरात घसरण, प्रमुख बाजार समित्यांमध्ये आवक वाढली


महाराष्ट्रात अचानक टोमॅटोच्या दरात घसरण (Tomato prices fall) होत असल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रातील नाशिक (Nashik) जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये टोमॅटोच्या दरात तब्बल 37 टक्क्यांनी घसरण झाली असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियनं दिले आहे.



टोमॅटोच्या एका कॅरेटचा (20 किलो) भाव 1 हजार 100 रुपयांवर आला आहे. मागील काही दिवसापूर्वी हा दर प्रति क्रेट 1 हजार 750 रुपये होते. सध्या अनेक ठिकाणी टोमॅटोचा दर भाव 55 रुपये प्रति किलोवर आले आहेत.

टोमॅटोचा पुरवठा वाढला, दरात घसरण

टोमॅटोच्या दरात घसरण ही सर्वसामान्यांसाठी चांगली बातमी असली तरी शेतकऱ्यांसाठी तितकीशी चांगली नाही. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात एक कॅरेट टोमॅटोला घाऊक बाजारात सरासरी 2 हजार 400 रुपये मिळत होते. मात्र, आता टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. टोमॅटो दरात घसरण होम्याचे मुख्य कारण म्हणजे पुरवठा वाढल्याचे सांगितले जात आहे. पिंपळगाव, नाशिक आणि लासलगाव या तीन कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (एपीएमसी) टोमॅटोचा पुरवठा आठवडाभरापूर्वी 6,800 क्रेटवरून 25,000 कॅरेटवर पोहोचला आहे.

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव ही राज्यातील सर्वात मोठी टोमॅटोची बाजारपेठ आहे. त्यामुळं पिंपळगाव इथं दैनंदिन आवक 1 हजार 500 कॅरेटवरुन 15,000 कॅरेटपर्यंत वाढली आहे, तर नाशिक येथे 5 000 कॅरेटवरुन 10,000 कॅरेटवर पोहोचली आहे. लासलगाव येथे आवक 350 कॅरेटने वाढली आहे.

किंमती नियंत्रीत करण्यासाठी नेपाळमधून टोमॅटोची आयात

दरम्यान, टोमॅटोची वाढती मागणी लक्षात घेता आणि वाढलेल्या किंमती कमी करण्यासाठी नेपाळमधून टोमॅटोची आयात केली जात आहे. याबाबतची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली आहे. सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात टोमॅटोची खरेदी केली जात आहे. नॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NAFED) आणि इतर सहकारी संस्थांमार्फत दिल्ली-एनसीआर, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमध्ये टोमॅटो वितरित केले जात आहेत.

या राज्यात टोमॅटो उत्पादनात वाढ अपेक्षीत

हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये टोमॅटोच्या उत्पादनात ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. सप्टेंबरमध्ये ती 9,56,000 मेट्रिक टन आणि ऑक्टोबरमध्ये 13,33,000 मेट्रिक टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळं आवक वाढल्यास टोमॅटोच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.

  • Tomato Import : नेपाळमधून भारतात टोमॅटोची आयात, वाढत्या किमंतीवर नियंत्रणासाठी निर्णय; अर्थमंत्री सीतारामण यांची माहिती


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button