ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंढरपूर येथील वारकरी अधिवेशनात झाले हे महत्त्वाचे ठराव


पंढरपूर: ‘हरिद्वार’ आणि ‘ऋषिकेश’ या तीर्थक्षेत्रांच्या धर्तीवर श्रीक्षेत्र पंढरपूर, देहू, आळंदी अन् पैठण ही तीर्थक्षेत्रे, तसेच राज्यातील सर्व मंदिरे अन् तीर्थक्षेत्रे यांचा परिसर 100 टक्के ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यात यावा; पंढरपूर येथील चंद्रभागा आणि आळंदी येथील इंद्रायणी नदीत सांडपाणी सोडण्यास बंदी घालावी; सर्व तीर्थक्षेत्रे, मंदिरांमध्ये ‘वस्त्रसंहिता’ लागू करावी, अशी एकमुखी मागणी पंढरपूर येथील ‘भव्य वारकरी अधिवेशना’त करण्यात आली वारकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री बालयोगी महाराज मठ, दत्तघाट येथे ‘वारकरी संप्रदाय’, ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘परमहंस परिव्राजकाचार्य श्री स्वामी नारायणानंद सरस्वती’ यांच्या संयुक्त हे वारकरी अधिवेशन घेण्यात आले. या अधिवेशनात संतमहंत, मान्यवर, हरि भक्त परायण, धर्माचार्य, हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रमुखांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी सर्वांनी कोणत्याही परिस्थितीत ‘हलाल उत्पादने’ विकत घेणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. या अधिवेशनासाठी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



उपस्थित मान्यवर – ह.भ.प. जय महाराज, ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, ह.भ.प. रामेश्वर शास्त्री, ह.भ.प. नरहरि महाराज चौधरी, ह.भ.प. मारुती महाराज तुणतुणे शास्त्री, ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, ह.भ.प. बापू महाराज रावकर, हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर, अधिवक्ता आशुतोष अनिल बडवे, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण समितीचे अध्यक्ष श्री. गणेश लंके, ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्लाळीकर, ह.भ.प अनंत सातपुते, ह.भ.प. वनवे महाराज, ह.भ.प. सुभाष महाराज शिंदे आणि ह.भ.प. रामचंद्र महाराज पेनोरे आदी उपस्थित होते.

अधिवेशनात करण्यात आलेले ठराव ! – वरील ठरावांसाह सर्व मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करावीत; हलाल प्रमाणपत्र असलेल्या उत्पादनांवर बहिष्कार घालावा; गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी; लव्ह जिहाद, धर्मांतरबंदी कायदे लागू करण्यात यावेत; हिंदु देवी-देवता, संत, श्रद्धास्थानांचे विडंबन रोखण्यासाठी कठोर कायदा करावा; गीता-रामायण अन् संत साहित्यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा; गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवून त्या जमिनी गोमातेसाठी संरक्षित करावी यांसह विविध ठराव अधिवेशनात संमत करण्यात आले.

या प्रसंगी ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ म्हणाले, ”वारकरी संप्रदायात हिंदुत्वाचे कार्य करण्याची शक्ती रक्ताच्या थेंबाथेंबात आहे हे वैकुंठवासी पूजनीय वक्ते महाराज यांनी दाखवून दिले आहे. सर्व प्रकरच्या ‘जिहाद’ला प्रत्युत्तर देण्यासाठी वारकरी संप्रदायाने प्रत्येक ठिकाणी हिंदूंचे प्रबोधन केले पाहिजे. यापुढील काळात कीर्तनकारांचे प्रबोधन करण्यासाठी त्यांचे अधिवेशन घेण्याची आवश्यकता आहे. जे ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणतात त्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता आहे.”

ह.भ.प. रामेश्वर शास्त्री महाराज म्हणाले, ”पंढरपूर हे पवित्र तीर्थक्षेत्र असूनही येथे सर्रास मद्य-मांस विक्री होते हे दुदैवी आहे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मद्य-मांस विक्रीवर बंदी असावी. त्यासाठी कठोर कायदा व्हावा, यासाठी समस्त वारकरी आणि हिंदू यांनी सरकारवर दबाव आणायला हवा.”

या प्रसंगी ह.भ.प. मारुती महाराज तुणतुणे म्हणाले, ”वैदिक धर्म हा अनादी-अनंत असून त्याची परंपरा अब्जावधी वर्षांची आहे. त्याचा आपल्याला अभिमान नसल्याने परधर्मियांचे आपल्यावर आक्रमण होत आहे. वारकर्‍यांनी कोणत्याही परिस्थितीत दिंडीत परधर्मियांना प्रवेश देता कामा नये.”

या प्रसंगी ह.भ.प. नरहरि महाराज चौधरी म्हणाले, ”सध्या शालेय शिक्षणात खरा इतिहास शिकवला जात नाही. मुघलांचा इतिहास अधिक शिकवला जात आहे. खरे तर संत साहित्य पाठ्यपुस्तकांतून शिकवले पाहिजे.” ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्लाळीकर म्हणाले, ”मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम मागील अनेक वर्षांपासून आपण भोगत आहोत. धर्मावर होणारे हे आघात रोखण्यासाठी कठोर कायदे करण्यात यावेत.”

या प्रसंगी ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक आणि ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट म्हणाले, ”दिनांक 9 मार्च 2004 रोजी सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी.एम्. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती शिवराज पाटील यांच्या खंडपीठाने ‘हरिद्वार’ आणि ‘ऋषिकेश’ या तीर्थक्षेत्रांत नगरपालिका प्रशासनाने आणलेली ‘मांस-मद्य’ यांवरील बंदी कायम ठेवली होती. त्याचधर्तीवर महाराष्ट्र शासनाने हा निर्णय राज्यात तात्काळ लागू करावा. सर्व हिंदूंनी हलाल उत्पादनांवर बहिष्कार टाकून ‘हलाल जिहाद आणि हलाल उत्पादनांची सक्ती’ देशातून हद्दपार करण्यासाठी संघटित होणे आवश्यक आहे.”

या वेळी प्रस्तावना करतांना ‘हिंदु जनजागृती समिती’चे सोलापूर, बीड आणि लातूर जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे म्हणाले, ”मंदिर संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी केवळ 4 महिन्यांत महाराष्ट्रातील 145 हून मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. पुढील काही महिन्यांत 1 हजार मंदिरांत वस्त्रसंहिता लागू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.” अधिवेशनाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे डॉ. श्रीपाद पेठकर यांनी केले. तर हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी गड-किल्ल्यांवर झालेले अतिक्रमण आणि त्या संदर्भात दिलेला लढा याची माहिती दिली. पसायदानाने वारकरी अधिवेशनाची सांगता झाली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button