ताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या ४० लाचखोरांना धडा शिकवा; शिक्षण आयुक्तांचे एसीबीला पत्र


पुणे : गेल्या काही वर्षांमध्ये शालेय शिक्षण विभागाच्या विविध कार्यालयांतील सुमारे ४० अधिकारी कोणत्या ना कोणत्या प्रकरणामध्ये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी)च्या सापळ्यात अडकले आहेत. या सर्वांची खुली चौकशी करण्यासंबंधी शिक्षण आयुक्तांनी एसीबीला पत्र दिले आहे.



सरकारी कार्यालय, पोलिस विभागाप्रमाणेच शिक्षण क्षेत्रालाही भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. अनेक शिक्षक, शिक्षणाधिकारी यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. मात्र, यांची चौकशी करताना एसीबीला अडचणी येतात. चौकशीअभावी ते काहीच न घडल्यासारखे ते पुन्हा सेवेत रुजू होऊन भ्रष्टाचार सुरु ठेवतात. त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळेच शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला ‘त्या’ सर्वांची खुली चौकशी व्हावी, असे पत्र दिले आहे.

बदलीचा काळ सुगीचा

शिक्षणाधिकाऱ्यांसाठी शिक्षकांच्या बदल्यांचा काळ सुगीचा असतो. शिक्षक बदलीच्या फायलीवर आर्थिक वजन ठेवल्यानंतर शिक्षकांची सोयीच्या जिल्ह्यात बदली झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यंदाच्या वर्षी पाचच महिन्यांत नंदुरबार, नाशिक, चंद्रपूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये शिक्षण विभागाची लाचखोरीची प्रकरणे समोर आली आहेत.

मांढरे यांच्याकडून जवळपास राज्यातील सर्वच परिक्षेत्रातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षकांना पत्रे गेलेली आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

१२ जण लाच घेताना सापळ्यात

– शिक्षकांच्या बदल्यांपासून ते शाळा सोडल्याच्या दाखल्यावर आईचे नाव दुरुस्त करून देणे, बडतर्फ केलेल्या मुख्याध्यापकाला पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यासाठी संस्थेला पत्र देणे अशा विविध कारणांसाठी राज्यातील आठ विभागांपैकी सहा विभागांत शिक्षण क्षेत्रातील १२ जण लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकले आहेत.

– त्यामध्ये शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, लेखाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांचा समावेश आहे. नाशिक ३, पुणे २, नागपूर २, औरंगाबाद २, ठाणे १ आणि नांदेड २ अशा सहा परिक्षेत्रात लाचखोरीच्या प्रकरणांची नोंद झाली आहे.

ज्या अधिकाऱ्यांची सचोटी व चारित्र्य संशयास्पद वाटत आहे, अशा ४० अधिकाऱ्यांची खुली चौकशी करण्याबाबत संबंधित विभागीय पोलिस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना पत्र दिलेले आहे. काही प्रकरणात ट्रॅपमध्ये सापडूनसुद्धा त्यामध्ये काही पळवटाद्वारे निर्दोष मुक्तता होऊन अधिकारी पुन्हा मूळ पदांवर रुजू होतात. या बाबीला आळा घालणे व या चुकीच्या वर्तनाबाबत योग्य शिक्षा व्हावी, या हेतूने हे पत्र देण्यात आलेले आहे. – सूरज मांढरे, राज्याचे शिक्षण आयुक्त


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button