शेतकऱ्यांचा विम्यावरून आक्रमक पवित्रा; तापमापक यंत्रणा सदोष?
पीकविमा शेतकऱ्यांसाठी आहे की कंपनीच्या हितासाठी असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. जळगाव जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात सूर्य आग ओकला तरी भडगाव तालुक्यात केवळ एकच मंडळ विमा कंपनीच्या निकषात पात्र ठरल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळाले. जिल्ह्यासह भडगाव तालुक्यात यंदा एप्रिल व मे महिन्यात प्रचंड उष्णतेची लाट पाहायला मिळाली. एप्रिलमधेच पाऱ्याने ४२ अंश ओलांडल्याचे बघायला मिळाले. मात्र हवामान केंद्रात विम्याच्या निकषाला आवश्यक उष्णता मोजली गेली नसल्याने शेतकरी पीकविम्याच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
भडगावातील एकच मंडळ
केळी पीकविम्याच्या लाभात भडगाव तालुक्यातील केवळ भडगाव मंडळच पात्र ठरले आहे. एप्रिल महिन्यात सलग पाच दिवस ४२ सेल्सिअस तर मे महिन्यात सलग ५ दिवस ४५ अंश सेल्सिअस तापमान मोजले गेले. अशा मंडळांना या विम्यासाठी पात्र ठरविण्यात आले.
ज्या ठिकाणाहून हे हवामान मोजले जाते ते केंद्र फक्त मंडळ स्तरावर कार्यान्वित करण्यात आलेले आहे. एका केंद्रावरून आठ ते गाव दहा गावांचे तापमान हे मोजले जाते, त्यामुळे तापमान मोजण्याची ही पद्धतच सदोष अन् अत्यंत चुकीची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सदोष पद्धतीचा मोठा फटका बसला आहे. निकष कसे ठरवले जातात
केंद्राने ॲग्रीकल्चर इन्श्युरंन्स कंपनीला विम्याचे काम दिले आहे. विमा कंपनी ही क्लाइमेट या कंपनीकडून हवामानाचा डाटा विकत घेते. संबंधित कंपनीकडून आलेल्या डाटानुसार कंपनी शेतकऱ्यांना भरपाई देत असते. क्लायमेट कंपनीने मंडळ स्तरावर हे हवामान केंद्र कार्यान्वित केलेले आहेत.
म्हणजेच भडगाव तालुक्यात चार ठिकाणी हे हवामान केंद्र कार्यान्वित आहेत. या चार केंद्रावरून भडगाव तालुक्यातील ६३ गावांचे हवामान मोजले जाते. आता भडगाव मंडळातील शिवणी व वडजी हे गाव विम्याच्या निकषानुसार विम्यासाठी पात्र आहेत.
मात्र या गावापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर पिचर्डे, बात्सर हे गाव कोळगाव मंडळात येत असल्याने ही गाव विम्याच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. कारण कोळगाव येथील हवामान केंद्रावर निकषानुसार आवश्यक असलेले तापमान मोजले गेलेले नाही. काय केले पाहिजे?
मुळात विषय असा आहे की हवामान केद्रांची संख्या खूप तोकडी आहे. राज्याचा विचार केला तर ४४ हजार गावे आहेत अन् हवामान केंद्र साधारपणे २ हजार १०० जवळपास आहेत म्हणजे ४४ हजार गावांचे हवामान हे २ हजार १०० गावातील तापमानावर मोजले जाते.
हे शीतावरून भाताची परीक्षा करण्यासारखे आहे. आता पिचर्डेला वादळ आले आणि कोळगावला वादळच आले नाही तर पिचर्डेच्या शेतकऱ्यांना काहीच भरपाई मिळणार नाही. कारण वाऱ्याचा वेग मोजणारे यंत्र हे कोळगावला आहे. त्यामुळे प्रत्येक गावात हवामान केंद्र असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्याचा उद्रेक
एकीकडे पीकविमा भरायला लावायचा अन् दुसरीकडे तांत्रिक अडचणी सांगून शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित ठेवायचे, असाच काहीसा प्रकार विम्याच्या भरपाईवरून समजत असल्याचे मत मांडत पिचर्डे येथील शेतकरी चांगलेच भडकले. शेजारी असलेल्या गावांना विम्याचा लाभ मिळतो आणि आमच्या गावातही नुकसान होऊन आम्ही लाभापासून वंचित राहतो. हे अत्यंत चुकीचे आहे, त्यामुळे शासनाने आम्हालाही त्या गावांसारखी भरपाई द्यावी, अन्यथा आम्ही मोठे आंदोलन उभे करू, असा पवित्रा पिचर्डे येथील शेतकऱ्यांनी घेतला आहे.
“आमच्या शेजारच्या शेतकऱ्याला विम्याचा लाभ मिळतो आणि आमचे शेत हे केवळ दुसऱ्या मंडळात असल्याने आम्ही अपात्र ठरतो. त्यांचे जेवढे नुकसान झाले तेवढेच आमचेही झाले आहे. ही वस्तुस्थिती समजून आम्हाला पात्र ठरविण्यात यावे, अन्यथा आंदोलन उभारू.” – विनोद बोरसे, शेतकरी, पिचर्डे (ता. भडगाव)
“मुळात यंदा एप्रिल आणि मे महिन्यात प्रचंड उष्णतेची लाट होती. भडगावात निकषाएवढे तापमान मोजले जात असेल आणि कोळगाव ते मोजले गेले नसेल तर तेथील यंत्रात बिघाड आहे, असे आमचे मत आहे. त्यामुळे भडगाव येथील हवामान केंद्रावरील डाटा हा भडगाव तालुक्यातील पूर्ण मंडळासाठी ग्राह्य धरण्यात यावा, अशी आमची मागणी आहे.”