क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रमुंबई

मुंबई : सोने व्यापाऱ्याची ४२ लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेडया


हैद्राबादमध्ये ज्वेलरी एक्झिबिशनसाठी गेलेल्या झव्हेरी बाजारमधील सोने व्यापाऱ्याशी सोने व्यापारी बनून ओळख वाढवत ४२ लाखांना गंडा घालणाऱ्या राजस्थानमधील दोन जणांना लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.हुकूमसिंग राजपूत आणि छत्तरसिंग राजपूत अशी या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याजवळून चोरीचे ३५ लाख रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मारुती कार जप्त केली आहे.

यातील फसवणूक झालेल्या सोने व्यापाऱ्याचा झवेरी बाजारमध्ये सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. १९ मे ला ते हैद्राबादमध्ये आयोजित ज्वेलरी एक्झिबिशनसाठी गेले होते. येथे त्यांना आरोपी हुकूमसिंग हा सोने व्यापारी बनून भेटला. त्याने त्याच्याकडे असलेल्या विविध प्रकारच्या सोन्याच्या डिझाईनचे फोटो फिर्यादी सोने व्यापारी यांना दाखवून दागिने खरेदी करणार का? अशी विचारणा केली.

डिझाईनन पसंत पडल्याने त्यांनी हुकूमसिंग याला ५० लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची ऑर्डर दिली. हुकूमसिंग याने २२ मे ला फिर्यादी सोने व्यापाऱ्याला कॉल करुन दागिन्यांची ऑर्डर तयार झाली आहे. पैसे पाठवा, असे सांगितले. ऑर्डर पाठविल्यानंतर पैसे देतो असे फिर्यादी सोने व्यापारी यांनी त्याला सांगितले. मात्र, हुकूमसिंग याने त्यांचा विश्वास संपादन करून सुरुवातीला काही रक्कम दिली तरच, ऑर्डर पाठविणे शक्य असल्याचे सांगितले.

दोघांमध्ये बोलणे होऊन ४२ लाख रुपये ऑर्डर घेण्यापूर्वी उर्वरीत रक्कम ऑर्डर मिळाल्यानंतर देण्याचे ठरले. हुकूमसिंग याने त्याचा साथीदार छत्तरसिंग याला आयुष्यमान नाव सांगून फिर्यादी व्यापाऱ्याच्या दुकानामध्ये पाठवले. फिर्यादी सोने व्यापाऱ्याने विश्वास ठेवून दोन हजार रुपयांच्या ४२ लाखाच्या नोटा त्याला दिल्या. एका तासामध्ये हुकूमसिंग यांच्याकडून दागिन्याची ऑर्डर आणून देतो असे सांगून तो निघून गेलेला आयुष्यमान परतलाच नाही.

फिर्यादी सोने व्यापाऱ्याने हूकूमसिंग आणि आयुष्यमान यांच्या मोबाईलवर फोन केला असता दोन्ही नंबर बंद आले. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने फिर्यादी सोने व्यापाऱ्याने लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन पायधुनी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त जोत्स्ना रासम आणि लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याच्या व पोनि. ज्योती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुशिलकुमार वंजारी यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुन्ह्यातील तांत्रिक पुराव्यांच्या आधारे गुन्ह्याचा तपास सुरू केला.

आरोपी हे मिरारोड येथून पुढे राजस्थानला गेल्याचे दिसून आले. पोलीस पथकाने राजस्थान येथे जात आरोपींची ओळख पटविली. आरोपी हे येथील कुकावास या गावामध्ये लपून बसले होते. कुकावास या गावामध्ये यापूर्वी कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर अनेक वेळा हल्ले झाले असल्याने लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांचे पथक गावाच्या बाहेर दबा धरून बसले. २८ मे ला दोन्ही आरोपी गावामधून बाहेर पडताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन लुबडिया परिसरात त्यांना ताब्यात घेतले. राजस्थानमधील बागोडा पोलीस ठाण्यात या आरोपींना अटक करुन त्यांना मुंबईत आणण्यात आले आहे. मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने आरोपींना २ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी राजस्थानामधील जालोरचे रहिवासी

मूळचे राजस्थानातील जालोरचे रहिवासी असलेल्या या आरोपींपैकी हुकूमसिंग हा दुकानात कामगार आहे. तर, छत्तरसिंग हा नोकरी करतो. यातील फिर्यादी यांनी आरोपींना दोन हजार दराच्या नोटा दिल्या होत्या. या नोटा चलनातून मागे घेण्यात आल्याने फिर्यादी हे तक्रार करणार नाहीत असे आरोपींना वाटले होते. त्यामुळे, दोघेही बिनधास्तपणे कुकावास गावातून बाहेर पडले आणि पोलिसांच्या हाती लागले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button