उद्योजकाला अडकवले हनी ट्रॅपमध्ये

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

तळेगाव:शिक्रापूर येथील एका महिलेने इंस्टाग्राममधून ओळख झालेल्या एका उद्योजकाला घरी बोलावले, त्यानंतर महिलेच्या पतीने या उद्योजकाचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत काही खंडणी उकळली. त्यानंतरदेखील वारंवार व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पाच लाख रुपये खंडणीची मागणी केल्याने उद्योजकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवणार्‍या पूनम परशुराम वाबळे व परशुराम अंकुश वाबळे या बंटी-बबलीवर शिक्रापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर पोलिस ठाण्यात याबाबत राहुल संभाजी झगडे (वय 26, रा. झगडेवाडी, कुरकुंभ, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर (ता. शिरूर) येथे राहणार्‍या पूनम वाबळे या महिलेची इंस्टाग्रामच्या माध्यमातून कुरकुंभ येथील उद्योजक राहुल झगडे याच्याशी ओळख झाली. त्यांनतर दोघे मैत्रीच्या भावनेतून बोलू लागले असताना पूनम हिने राहुलला घरी बोलावले. दोघे घरी बोलत असताना पूनमचे पती परशुराम यांनी दोघांचा बोलताना व्हिडिओ मोबाईलमध्ये काढून घेतला.

त्यानंतर परशुराम याने राहुलकडे एक कोटी रुपयांची मागणी केली; अन्यथा हा व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी त्याने राहुलला दिली. त्या वेळी राहुल याने 25 हजार रुपये फोन पे द्वारे परशुरामला पाठवले; मात्र त्यांनतरदेखील पुन्हा परशुराम हा वारंवार फोन करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. मंगळवारी (दि. 23) पूनम वाबळे हिने राहुल यास फोन करून तू शिक्रापूरमध्ये ये, आपण हा विषय संपवून टाकू, असे म्हणून राहुलला बोलावून घेतले.

त्यांनतर तिने राहुलला मी व्हिडिओचा विषय संपवून टाकते, तू मला पाच लाख रुपये अथवा एक फ्लॅट दे, असे म्हणून खंडणी मागितली. राहुल संभाजी झगडे यांच्या फिर्यादीवरून घडलेल्या प्रकाराबाबत शिक्रापूर पोलिसांनी पूनम परशुराम वाबळे व परशुराम अंकुश वाबळे (दोघेही रा. शिक्रापूर, ता. शिरूर) या बंटी-बबलीवर गुन्हे दाखल केले. पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे या तपास करीत आहेत.