पित्याने विष पाजलेल्या ‘त्या’ चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

जालना : जालना जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली होती. यामध्ये चारित्र्यावर संशय घेल्यामुळे पती- पत्नींमध्ये वाद झाला. यानंतर आरोपी पतीने रागाच्या भरात पोटच्या दोन्ही मुलींना उंदीर मारायचे औषध पाजून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला.
यामधील एका मुलीचा मृत्यू पाच दिवसांपूर्वी तर दुसरीचा मृत्यू मंगळवारी झाला. या प्रकरणी नराधम बापावर गुन्हा (Crime) दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. कृष्णा पंडित (वय 31 वर्षे, रा. शहागड, ता. अंबड) (Krushna Pandit) असे आरोपी बापाचे नाव आहे तर शिवाज्ञा कृष्णा पंडित (Shivajna Krishna Pandit) असे मृत पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
कृष्णा पंडित हा कॉम्प्युटरचा व्यवसाय करतो आणि त्याची पत्नी मनीषा ही एका बँकेत कामाला आहे. दरम्यान 8 मे रोजी सोमवारी बँक बंद झाल्यानंतर मनीषा या घरी गेल्या. तर कृष्णा हा सतत मनीषा यांच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे नेहमीच्या वादाला कंटाळून मनीषा या दोन्ही मुलींना घेऊन माहेरी निघाल्या होत्या. या गोष्टीचा राग आल्याने कृष्णाने त्यांच्या डोक्यात वीट मारली. ज्यात मनीषा या जखमी झाल्या. यानंतर त्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्या मावस भावाकडे राहण्यासाठी गेल्या. दरम्यान दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी दहा वाजता कृष्णा हा दोन्ही मुलींना घेऊन पत्नीकडे गेला. यानंतर त्याने घरी चल, नाही तर मी मुलींना मारुन टाकीन, अशी धमकी आपल्या पत्नीला दिली.

यानंतर मनीषा यांनी कृष्णाला घरी येण्यास नकार दिल्याने कृष्णा घराबाहेर गेला. त्याने श्रद्धा आणि शिवाज्ञा या दोन्ही मुलींना उंदीर मारायचे विषारी द्रव पाजले. नंतर त्यानेदेखील विष प्राशन केले. यानंतर सगळेजण बेशुद्ध पडले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यावर 10 मे रोजी कृष्णा याची तब्येत बरी झाली. परंतु, मुलीच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. अखेर 11 मे रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास श्रेयाचा तर 16 मे रोजी सकाळी शिवाज्ञाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या दोघींवर शहागड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.