ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीताफळातील फळधारणा कशी वाढवायची?


महाराष्ट्रात सीताफळाची (Custerd Apple) मोठ्या प्रमाणात लागवड होते. आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तरप्रदेश व बिहार या राज्यांत सीताफळाची लागवड मोठ्या प्रमाणात होते.महाराष्ट्रातील नगर, परभणी, नाशिक, सोलापूर या जिल्ह्यांत सीताफळाची झाडे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. सीताफळात परपरागसिंचन होत असल्याने यामध्ये फळांची विविधता दिसून येते.



अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.

सीताफळाला द्विलिंगी फूलधारणा असल्याने एकाच फुलात स्त्रीकेशर व पुंकेशर असतात. असे जरी असले तरीही यामध्ये परपरागसिंचन घडून येते. याचे कारण असे, की या फळांमधील मादी अर्थात स्त्रीकेशर ही नरापेक्षा म्हणजेच पुंकेशरपेक्षा फलनासाठी लवकर पक्व होते; परंतु याचवेळी पुंकेशर हे फलनासाठी अपक्व असतात.

या प्रक्रियेला डायकोगॅमी (Dichogamy) म्हणतात आणि म्हणूनच त्यांच्यात स्वपरागसिंचन होत नाही, तर परपरागसिंचन होते. यामध्ये मादी पक्व झाली आणि लगेच परागसिंचन होते असे नाही. या परागसिंचनावर वातावरणातील काही घटकांचा परिणाम होत असतो.

परागसिंचनावर कोणत्या घटकांचा परिणाम होतो?

उष्ण कोरड्या वातावरणात मादीची परागकणधारण करण्याची क्षमता फार कमी वेळाची म्हणजेच २ ते ३ तासांपुरतीच मर्यादित होते. त्यामुळे जे काही नैसर्गिक परागसिंचन किडींमुळे होते, ते फार कमी प्रमाणात होते.

उष्ण व कोरड्या वातावरणातील हवेत आर्द्रता फार कमी असल्यामुळे मादीची फलनाची सक्रियता व परागकणांची कार्यक्षमता कमी होते. या अशा वातावरणाचा परागसिंचनाच्या कार्यात व्यत्यय आल्यामुळे परागसिंचन व्यवस्थित होत नाही.

परिणामी फुले उच्च तापमानामुळे करपून जातात व फळधारणा कमी प्रमाणात होते किंवा होत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात ज्यांना फळधारणा घ्यावयाची असेल, त्यांनी पुरेशी आर्द्रता व तापमान सौम्य कसे राहील, यावर भर देणे गरजेचे आहे.

सर्वसाधारणपणे सकाळच्या आणि संध्याकाळच्या सौम्य वातावरणात सीताफळाची फुले उमलतात. यात मादीची सक्रियता पहिल्या दिवशी, पहिल्या सकाळी जास्त असल्यामुळे त्या दिवशी जास्तीत जास्त फळधारणा होण्यास मदत होते.

पहिल्या दिवशी परागसिंचन नाही झाले, तर मात्र फळधारणेत बऱ्यापैकी घट येते. यासाठी उत्तम परागसिंचन होऊन फळधारणा व्यवस्थित होण्यासाठी बागेमधील तापमान २० अंश सेल्सिअस ते २५ अंश सेल्सिअस ठेवावे, ते असणे आवश्यक असते.

हे तापमान फळधारणा होण्यासाठी उपयुक्त तापमान आहे. सीताफळाची फळधारणा तापमानावर जास्त अवलंबून असल्यामुळे फळधारणेच्या वेळी दिवस व रात्रीचे विशिष्ट तापमान परिणामकारक ठरते. उपयुक्ततेपेक्षा जास्त तापमान असल्यास परागकण व स्टिग्मा यांना इजा होऊन ते करपून जातात.

उन्हाळ्यातील फळधारणा यशस्वी करण्यासाठी काय करावे?

१) बागेतील तापमान कृत्रिम उपाययोजना करून थोडेसे नियंत्रित करता येते. यासाठी फळबागेत आच्छादन करावे, झाडांना पुरेसे पाणी द्यावे. यामुळे बागेतील तापमान कमी होण्यास मदत होईल.

२) कृत्रिम परागसिंचनाच्या बाबतीत परागकण जमा केल्यानंतर पहिल्या एक ते दोन तासांत हाताने योग्य प्रकारे योग्य प्रकारच्या ब्रशने ताबडतोब परागीकरण केल्यास ८० ते ८५ टक्के फळधारणा होते. परंतु परागकण साठवून उशिराने १० किंवा २० तासांनंतर परागसिंचनाची क्रिया घडविल्यास अनुक्रमे ६५ ते ३५ टक्के फळधारणा होते.

तर नैसर्गिक परागसिंचन फक्त सहा टक्के होते. त्यामुळे व्यापारी तत्त्वावर दर्जेदार व अधिक उत्पादनासाठी कृत्रिम परागसिंचन आवश्‍यक ठरते. मात्र कृत्रिम परागसिंचन हे खर्चिक व वेळ लागणारी प्रक्रिया आहे.

३) संजीवकांचा वापर परागसिंचन व्यवस्थित होण्यासाठी करण्यात येत असला, तरी याच्या वापरामुळे फळे तडकण्याचे प्रमाण वाढते, नुकसान होते. त्यामुळे सीताफळामध्ये उन्हाळी बहर धरण्यासाठी कृत्रिम परागसिंचन हा एक उपाय आहे.

अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button