शुभमंगल सामुदायिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
धुळे: शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत शुभमंगल सामुदायिक, नोंदणीकृत विवाह योजना जिल्ह्यातील खुले प्रवर्ग व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या निराधार, विधवा, परित्यक्ता महिलांच्या केवळ दोन मुलींच्या विवाहासाठी राबविण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे यांनी केले. शुभमंगल सामुदायिक विवाह योजना जिल्ह्यातील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात येते. विवाह करणाऱ्या जोडप्यास दहा हजार रुपये व सामुदायिक विवाहाचे आयोजन करणाऱ्या संस्थेस एका जोडप्यामागे दोन हजार रुपये अनुदान देण्यात येते.
संस्थेस योजना राबविताना किमान पाच व कमाल शंभर जोडप्यांचा समावेश करण्याची परवानगी आहे. संस्थेस वर्षातून दोनदाच सामुदायिक विवाह समारंभ आयोजित करता येतील. स्वयंसेवी संस्थेने पात्र लाभार्थ्यांची सर्व कागदपत्रे एकत्रित करून विवाह सोहळ्याच्या किमान एक महिन्याअगोदर सादर करणे आवश्यक राहील. तसेच विवाह सोहळ्यात भाग घेतलेल्या जोडप्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग व विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे बधनकारक राहील.
संपर्कासाठी आवाहन
नोंदणीकृत विवाह योजनेमध्ये नोंदणीकृत विवाह करणाऱ्या खुले प्रवर्ग व इतर मागासवर्गीय दांपत्यांना या योजनेद्वारा दहा हजार रुपयांचा लाभ देण्यात येईल. ज्या जोडप्यांना फक्त नोंदणीकृत विवाह करावयाचा आहे, त्यांना सामुदायिक विवाह सोहळ्यात सामील होणे बंधनकारक नाही. शुभमंगल सामुदायिक नोंदणीकृत विवाह योजनेसाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीमार्फत दर वर्षी निधी मंजूर केला जातो.
त्यामुळे ज्या नोंदणीकृत संस्था शुभमंगल सामुदायिक विवाह योजना राबविण्यासाठी उत्सुक असतील त्यांनी तसेच नोंदणीकृत विवाह करणाऱ्या खुले प्रवर्ग व इतर मागासवर्गीय दांपत्यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, ५२, जयहिंद कॉलनी, सुधा हॉस्पिटल, देवपूर, धुळे येथे संपर्क साधावा, तसेच विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घेऊन प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले.