ताज्या बातम्यामहाराष्ट्र

तब्बल 15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पगार झाल्याच्या आनंदात असतानाच विचित्र अपघात; शिक्षकासह मुलाचा मृत्यू


छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या नक्षत्रवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात एका शिक्षकासह दहा वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे  हा अपघात एवढा भीषण होता की, दोन ट्रकच्यामध्ये शिक्षक दुचाकीसह अडकला होता. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. ज्यात शिक्षक संजय सुखदेव दहिफळे (वय 43) आणि त्यांचा मुलगा समर्थ दहिफळे (वय 10 वर्ष, दोन्ही राहणारे पिंपळवाडी, ता.पैठण) जागीच मृत्यू झाला आहे. तर संजय यांच्या पत्नी वर्षा दहिफळे या देखील अपघातात गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर शहरातील सिग्मा रुग्णालयात उपचार सुरू आहे.



संजय दहिफळे यांच्या मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. त्यामुळे नीटच्या तयारीसाठी तिने शहरातील एका खाजगी क्लासमध्ये प्रवेश घेतला होता. दरम्यान संजय यांच्या पत्नी वर्षा यांचं माहेर बीड बायपासला असल्यामुळे त्या आपल्या मुलांसह आधीच शहरात आल्या होत्या. तर मुलांना भेटल्यानंतर संजय हे पत्नी मुलगा समर्थसह दुचाकीवरून पैठणकडे निघाले होते. मात्र नक्षत्रवाडी जवळ पैठणकडून एक खडीचा हायवा येत होता आणि दुसऱ्या बाजूने पैठणकडे एक बलेनो कार जात होती. यावेळी हायवाने बलेनो कारला जोराची धडक दिली. या धडकेत संबंधित कार रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली. मात्र याचवेळी अपघातग्रस्त हायवाने संजय यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

हा अपघात एवढा भीषण होता की, हायवाने संजय यांच्या गाडीला धडक दिल्यावर त्यांची दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली. या हायवाचा एवढा वेग होता की, संजय यांच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर अपघातग्रस्त हायवा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या हायवावर जाऊन आदळला. या भीषण अपघातात संजय आणि त्यांचा मुलगा समर्थ दहिफळेचा जागीच मृत्यू झाला. तर संजय यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. विशेष म्हणजे संजय यांच्या दुचाकीला धडक देणार हायवा चुकीच्या पद्धतीने आला होता असा दावा उपस्थितांनी केला आहे.

पंधरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झाला पगार!

वडगोद्री येथील विवेकानंद शिक्षण संस्थेच्या श्री गुरुदेव विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयात संजय दहिफळे हे 2008 पासून शिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र त्यांना पगार सुरू झाला नव्हता. पुढे 2018 मध्ये त्यांना अनुदानासाठी मान्यता मिळाली. मात्र प्रत्यक्षात पगार हाती आला नव्हता. दरम्यान मार्च महिन्याच्या पहिलाच 15 हजार रुपये पगार दोन दिवसांपूर्वी त्यांच्या बँक खात्यात जमा झाला होता. विशेष म्हणजे एवढ्या वर्षांनी मिळालेला पगार त्यांनी बँकेतून काढलाही नव्हता, पण त्यापूर्वीच त्यांचा अपघाती मृत्यू झाला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button