ताज्या बातम्यादेश-विदेशनागपूरमहत्वाचेमहाराष्ट्र

भीममय. ‘जयभीम’मय नागपूर, वस्त्यावस्त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जल्लोष


नागपूर : महिलांना शिक्षण, मतदानाचा, संपत्तीचा हक्क, प्रसुती रजेचा लाभ, कर्मचाऱ्यांची पेन्शन योजना, भारतीय रिझर्व्ह बॅंकेची स्थापना, सिंचन सोयींसाठी देशात पहिले धरण उभारण्याचे पाऊल, देशाचा कारभार चालतो ते संविधान आणि अशा कितीतरी मानवी हक्काच्या, हिताच्या गोष्टी करीत आधुनिक भारताच्या जडणघडणीत सिंहाचे योगदान देणारे युगपुरुष, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.



लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !

पण बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन दलित, शाेषित, वंचितांना प्रकाशाच्या वाटेवर आणत सन्मानाचा हक्क ज्या भूमित मिळाला त्या नागपुरात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे उत्सव आणि उत्साहाचा क्षण. हा उत्साह शुक्रवारी १३२ व्या जयंतीनिमित्तही दिसून आला. शहरातील कानाकाेपऱ्यात, वस्त्यावस्त्या महामानवाच्या जयंतीच्या जल्लाेषात न्हाउन निघाल्या. रस्त्यारस्त्यावरून ‘जयभीम’ चा जयघोष करीत दीक्षाभूमी आणि संविधान चौकाकडे निळ्या पाखरांचे थवेच्या थवे धावत होते.

घरांचे दार, वस्त्यांचे गेट अन रस्ते तोरण, पताका, पंचशील ध्वज आणि निळ्या कमानींनी सजले. तसे जयंतीच्या आदल्या दिवशीपासूनच शहरात उत्साह संचारला होता. मुक्त श्वासाने शुक्रवारी सकाळपासूनच अनुयायांची पावले संविधान चौक व दीक्षाभूमीकडे वळली. पांढरे शुभ्र वस्त्र, निळ्या पताका, पंचशील ध्वज घेऊन वस्त्यावस्त्यांमधून मिरवणुका निघाल्या. दिवसभर हजारो अनुयायांनी प्रेरणाभूमीला नतमस्तक होत तथागत बुद्ध व डाॅ. बाबासाहेबांना अभिवादन केले.

सकाळी परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीतर्फे समितीचे अध्यक्ष व धम्म सेनानायक भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई व भिक्खू संघाच्या उपस्थितीत दीक्षाभूमीवर बुद्ध वंदना घेण्यात आली. समता सैनिक दलाच्या शेकडाे सैनिकांनी परेड करीत महामानवाला मानवंदना दिली. रात्री उशिरापर्यंत दीक्षाभूमी उपासक, उपासिकांच्या उपस्थितीने फुलून गेली होती. शहरातील समस्त वस्त्यांमध्ये जणू भीमजयंतीचा उत्साह संचारला होता. भीम पहाटने सकाळची सुरुवात झाली. वस्त्यांमध्ये सामूहिक भोजन, भीमगीतांचे कार्यक्रम, भोजनदान झाले. नागरिकांनी मिठाई वाटून एकमेकांना भीमजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. निळ्या कमानी, तोरण, पताकांनी शहरातील वस्त्या सजल्या हाेत्या. जनू संपूर्ण शहरच भीममय… ‘जयभीम’मय झाले होते.

आदल्या रात्रीपासून दिवसभर संविधान चाैकात निळाई

इकडे संविधान चाैकही जयंतीच्या आदल्या रात्रीपासून उत्सवमय झाले हाेते. रात्री हजाराेंच्या संख्येने अनुयायांनी चाैकात येऊन जयंती साजरी केली. रात्री राेशनाईने हा परिसर उजळून निघाला हाेता. १२ च्या ठाेक्याला फटाक्यांची आतषबाजीने जयंतीच्या जल्लाेषाला उधान आले. यानंतर रात्री उशीरा घरांकडे वळलेली पाऊले शुक्रवारी सकाळी पुन्हा संविधान चाैकाकडे वळली. अनुयायी व बहुजन विचारक आबालवृध्दांच्या गर्दीने ओसंडून वाहत हाेता. सकाळपासून शेकडाे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय संस्था, संघटनांनी डाॅ. बाबासाहेबांना अभिवादन केले. संघटनांचे कार्यकर्ते, वस्त्यांमधील रॅली संविधान चाैकात पाेहचल्या हाेत्या. बुध्दम शरणम गच्छामीचे स्वर आणि बाबासाहेबांचा जयघाेष आकाशात भिनला हाेता.

साेशल मीडियावर शुभेच्छांचा पूर

साेशल मीडियावर भीमजयंतीच्या शुभेच्छा संदेशांनी ओसंडून वाहत हाेता. फेसबुक, व्हाॅट्सॲपवर वेगवेगळ्या छवीतील बाबासाहेबांचे छायाचित्र, त्यांचे विचार, तत्वज्ञान, संदेश पाठवून महामानवाच्या महान कार्याचे स्मरण करण्यात आले. साेशल प्लॅटफार्मवर आंबेडकरी विचारांवर मार्गदर्शन, प्रबाेधनपर कार्यक्रमांचे आयाेजनही करण्यात आले. देशाचे अर्थकारण, राजकारण, समाजकारण, संविधान, कायदे निर्मिती, ऊर्जा, वनसंवर्धन अशा विविध क्षेत्रात बाबासाहेबांच्या बहुआयामी कर्तृत्वावर प्रकाश टाकणारे संदेश सर्वत्र फिरत हाेते.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button