पोलिसांची वैद्यकीय तपासणी करणार; पोलीस रुग्णालय विशेष मोहीम राबविणार

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मुंबई: आणि मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी २४ तास कर्तव्यावर असलेल्या मुंबई पोलीस दलातील वयाची ४० वर्षे ओलांडलेल्या अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी नागपाडा पोलीस रुग्णालयाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत पोलिसांची रक्त तपासणी, सीटी स्कॅन, एमआरआय, मधुमेह, रक्तदाब आदी विविध चाचण्या करण्याबरोबरच त्यांना वैद्यकीय सल्ला देण्यात येणार आहे. अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या तपासणीची ऑनलाईन नोंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याची इत्यंभूत माहिती संकलित करण्यास मदत होणार आहे.

सणासुदीच्या दिवशीही तैनात राहून कर्तव्य चोख बजावणाऱ्या पोलिसांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास फारसा वेळ मिळत नाही. त्यामुळे वयाची चाळीशी ओलांडलेल्या अनेक पोलिसांना मधुमेह, रक्तदाब, मानसिक ताणतणाव यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. परिणामी, अनेक पोलिसांचे आरोग्य बिघडत असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या सेवेवर होतो. ही बाब लक्षात घेऊन मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या संकल्पनेतून अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी नागपाडा पोलीस रुग्णालयाच्या माध्यमातून ‘विशेष आरोग्य तपासणी’ मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार वयाची चाळीशी ओलांडलेल्या पोलिसांची तीन वर्षातून एकदा, तर ४५ वर्षांवरील पोलिसांची दोन वर्षांतून एकदा संपूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. यात पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचाही समावेश असणार आहे. पोलिसांना अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालयात आवश्यक जागा उपलब्ध करण्यात आली आहे. तर आवश्यक साहित्यच्या खरेदीसाठी सिद्धिविनायक मंदिराकडून दोन कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. त्याचप्रमाणे पोलिसांच्या तपासणीसाठी १० डॉक्टर आणि ४६ पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची नियुक्ती अंतिम टप्प्यात असून, येत्या महिनाभरामध्ये रुग्णालयात पोलिसांच्या आरोग्य तपासणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

अपेक्षित खर्च

मुंबई पोलीस दलामध्ये साधारणपणे ४१ हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी आहेत. या अधिकारी व कर्मचाऱ्यांची दररोज टप्प्याटप्याने तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी डॉक्टर व कर्मचाऱ्यांऱ्यांचे वेतन आणि विविध तपासणी व चाचण्या यासाठी दरमहा साधारणपणे ५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. वर्षभरासाठी साधारण सहा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या चाचण्या खासगी प्रयोगशाळेत केल्यास खर्च ९.५ कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती नागपाडा पोलीस रुग्णालयाचे वैद्यकशास्त्र सल्लागार विभागाचे पोलीस शल्य चिकित्सक डॉ. कपिल पाटील यांनी सांगितले.

या होणार चाचण्या

विविध रक्त चाचण्या, ईसीजी, क्ष-किरण, सोनोग्राफी, टू डी इको, सीटी स्कॅन, एमआरआय, मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात येणार आहे.

पोलिसांच्या नियमित तपासण्या करण्याच्या निर्णयामुळे त्यांना भविष्यात होणाऱ्या आजाराची पूर्वकल्पना येईल. त्यामुळे त्यांच्यावर वेळीच योग्य उपचार करता येतील. परिणामी, त्यांचे आरोग्य चांगले राहील आणि पोलिसांच्या कर्तव्यावर परिणाम होणार नाही. – डॉ. कपिल पाटील, पोलीस शल्य चिकित्सक, नागपाडा पोलीस रुग्णालय