नऊ वर्षाच्या मुलाची भरारी, अवघड तीन किल्ले एकाच वेळी केले सर

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


इगतपुरी : इगतपुरी तालुक्याला सह्याद्रीची पर्वतरांग लाभलेली आहे. या पर्वतरांगेतील अनेक गड किल्ल्यांना शिवकालीन वारसा लाभला आहे. यातील अलंग,मदन आणि कुलंग किल्ले अत्यंत खडतर समजले जातात.
धाडसी गिर्यारोहकही या किल्ल्यांपुढे नतमस्तक होतात. टप्प्याटप्प्याने इगतपुरी तालुक्यातील ही तिन्ही किल्ले सर करतात. मात्र घोटीतील एका धाडसी आणि जिद्दी चिमुकल्याने आपल्या वडिलांच्या साथीने एकाच वेळी तिन्ही किल्ले सर करून तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत आहे.

कोणी केले किल्ले सर

घोटीतील अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. भूषण धांडे यांचा नऊ वर्षाचा विहान या मुलाला लहान पणापासूनच ट्रेकिंगचा छंद आहे. वडीलांनाही हा छंद असल्याने हा छंद विहान यानेही जोपासला. वडीलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विहान याने लहान पणापासूनच लहान व सोपे गडकिल्ले सर केले. मात्र शिवकालीन वारसा लाभलेल्या अलंग, मदन आणि कुलंग या तिन्ही किल्ले एकाच वेळी सर करण्याचा निर्धार त्याने व्यक्त केला होता. मात्र हे तिन्ही किल्ले खडतर व अवघड असल्याने आरंभीच्या काळात वडीलांनी नकार दिला. मात्र विहान हा जिद्दीवर पेटल्याने अखेर हे किल्ले पादाक्रांत करण्याचे निश्चित झाले.

रॉक क्लाइम्बिंग करून चढाई

आग ओकणारा सूर्य,अरुंद पाऊलवाट, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष, जागोजागी पायऱ्या नसल्याने रॉक क्लाइम्बिंग करून चढाई अशी खडतर कसरत करीत विहान यांने आपले वडील डॉ. भूषण धांडे यांच्या साथीने सलगपणे तिन्ही किल्ले यशस्वीपणे सर केले. विहान याला या मोहिमेत डॉ. भूषण धांडे, कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, घाटघर येथील एकनाथ खडके आदींचे मार्गदर्शन लाभले. विहान याच्या धाडसाचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.

मोहीम सोपी नाही

कित्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहचत नाही. समोर मोठा पर्वत, रतन गड आणि मागे अलंग-मदन-कुलंग गड आणि कळसुबाई शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असताना ही सांधण दरी सर करणे आपल्याला वाटते तितके सोपे नाही.

मदनचा रॉक पॅच अलंगपेक्षा सोप्पा असला, तरी खाली खोल दरी असल्यामुळे मनात धडकी भरवणारा आहे. यामुळे काळजी घेऊन सर्व साधनांचा योग्य तो वापर करुन हा किल्ला सर करावा लागतो. या किल्ल्यातील शेवटचा रॉक पॅच क्लाइम्ब करून पुढे जावे लागते. विहानने ही मोहीम फत्ते केली.