वर्धा पोलिसांना ३,४०० रुपयांची टोपी देणारा आरोपी ठाण्यातून अटक

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


वर्धा :पोलिस अधीक्षक साहेबांचा गोपनीय बातमीदार आहे, असे सांगून चक्क पोलिसांनाच ३ हजार ४०० रुपयांची टोपी देऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीला ठाणे शहरातील इंदिरानगर परिसरातून अटक केली.
त्याच्याकडून मोबाईलसह रोख रक्कम असा एकूण २३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.योगेंद्रकुमार अतुलभाई सोलंकी रा. इंदिरानगर ठाणे, असे अटक आरोपीचे नाव आहे.

मी पोलिस अधीक्षक साहेबांचा गोपनीय बातमीदार असल्याचे सांगत रामनगर परिसरात मोठा जुगार सुरु असून जुगारच्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवायचा आहे. त्याला एक साधा मोबाईल विकत घेऊन द्यायचा असल्याने ३ हजार ४०० रुपये माझ्या खात्यावर टाका, असे आरोपीने सांगितले होते. पोलिसांनी आरोपीच्या फोन पे खात्यावर पैसे पाठविले. पैसे मिळताच आरोपी योगेंद्रकुमारने फोन बंद करुन पोलिसांचीच फसवणूक केली. याप्रकरणी रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा संमातर तपास स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलमार्फत करण्यात आला. आरोपीबाबत तांत्रीक माहिती हस्तगत केल्यानंतर आरोपी हा ठाणे शहर परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिस अधीक्षकांच्या आदेशान्वे तत्काळ पोलिस पथक ठाणे येथे रवाना झाले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी योगेंद्रकुमार यास ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात यशवंत गोल्हर, रामकिसन इप्पर, अनुप कावळे यांनी केली.

सतत चार दिवस पोलिसांनी रचला सापळा

वर्धा पोलिसांनी ठाणे परीसरातील वेगवेगळया ठिकाणी सतत चार दिवस सापळा रचला. मात्र, आरोपी पोलिसांना हुलकावनी देऊन पसार होत होता. पोलिसांनी आरोपीवर सतत पाळत ठेवुन ठाणे परीसरातील रंगोली साडी सेंटर, स्टेशन रोड परिसरातून मोठ्या शिताफीने अटक केली. त्याच्याकडून २ मोबाईल, ३,२०० रुपये रोख असा मुद्देमाल हस्तगत केला.

पोलिस अधिकाऱ्यांच्या मोबाईल क्रमांकाची यादी
पोलिसांनी आरोपी योगेंद्रकुमार याला ताब्यात घेत त्याला पोलिसी हिसका दाखविला असता त्याने सांगितले की, संपूर्ण राज्यात पोलिस अधिकाऱ्यांना फोन करुन जुगाराचा मोठा अड्डा तसेच विदेशी पिस्तुलची बातमी देतो, अशी बतावणी करुन पैसे उकळत असल्याची कबूली त्याने दिली. पोलिसांनी त्याच्या मोबाईलची पाहणी केली असता मोबाईलमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळया जिल्हयातील पोलिस अधिकाऱ्यांच्या मोबाईल क्रमांकाची यादीच आरोपीकडे असल्याचे पाहून पोलिसांनाही धक्का बसला.