ताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोशाळेच्या नावाखाली नेलेल्या गाईंची परस्पर विक्री; शेतकऱ्यांनीच सापळा रचून पकडले आरोपीला


छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांच्या गावरान गाई गोशाळेत पालन करण्यासाठी नेऊन त्यांची परस्पर विक्री करणाऱ्या आरोपीविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 शेतकऱ्यांच्या सजगतेमुळे हा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी आदेश दत्तात्रय कांदेकर (रा. दहेगाव, ता. जि. अहमदनगर) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ डिसेंबर २०२२ रोजी फेसबुकवर गावरान गाई पाळण्यासाठी आणि गोमूत्र जमा करण्यासाठी नेण्याबाबत एक पोस्ट आली. ही पोस्ट अगरवाडगाव येथील अरुण बबन वाघ यांनी पाहिली. वाघ यांना त्यांच्याकडील गाई सांभाळण्यासाठी देण्याची इच्छा झाल्याने त्यांनी त्यावरील मोबाईल नंबर डायल करून आदेश कांदेकर याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी आदेशने माझ्याकडे गोशाळा असून, मी गाई सांभाळतो, असा विश्वास वाघ यांना देऊन त्यांना व्हिडिओ कॉलवरून मंदिर व गोशाळा दाखविली.

यावर विश्वास ठेवून अरुण वाघ, वैभव भाऊसाहेब म्हसरुप (दोघे रा. अगरवाडगाव), आणि विवेक भाऊसाहेब नवले (रा. गणेशवाडी) या तिन्ही शेतकऱ्यांनी त्यास गाई सांभाळण्यासाठी देण्याचे कबूल केले. आदेश पिकअप घेऊन १६ डिसेंबर २०२२ रोजी अगरवाडगाव येथे आला. शेतकऱ्यांनी त्यांच्या ३ गाई आदेश कांदेकरच्या स्वाधीन केल्या. तीन महिन्यांचा काळ लोटल्यानंतर आपल्या गाईंना पाहण्याची शेतकऱ्यांना इच्छा झाली. त्यांनी त्यासाठी आदेशला फोन केला; मात्र आदेशने मोबाईल बंद करून टाकल्याने त्याचा संपर्क होत नव्हता. यावरून अरुण वाघ आणि इतर शेतकऱ्यांना आदेशने गाईॅ परस्पर विक्री करून आपली फसवणूक केल्याचे लक्षात आले.

शेतकऱ्यांनी रचला सापळा…
सोमवारी (दि.१०) अरुण वाघ आणि त्यांच्या गावातील इतर मित्रांनी आदेशला पकडण्यासाठी सापळा रचला. आदेशने फेसबुकवर दुसऱ्या नावाने जाहिरात देऊन गाई सांभाळण्यासाठी देण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी दुसऱ्या मोबाईल नंबरवरून त्याला गाई सांभाळण्यासाठी देण्याची इच्छा व्यक्त केली. सोमवारी सकाळी ११.३० वाजता गंगापूर तालुक्यातील ढोरेगावजवळ आदेश गाई घेण्यासाठी वाहन घेऊन आला असता, शेतकऱ्यांनी त्यास पकडले. आमच्या गाई परत दे, अशी मागणी त्याच्याकडे करण्यात आली. त्यावेळी तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. शेवटी शेतकऱ्यांनी त्यास गंगापूर पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी अरुण वाघ यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात आदेश कांदेकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. भागचंद कासोदे, विजय पाखरे करीत आहेत. यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून, यासाठी अहमदनगर, श्रीगोंदा, राहता आणि सोलापुरात तपासासाठी पथक पाठविले जाणार आहे. आरोपीला मंगळवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button