शरद पवार यांचे वेगळे सूर, मविआत चलबिचल? आघाडीचं काय होणार?

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


महाविकास आघाडीत सारंकाही आलबेल आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झालाय. त्याचं कारण म्हणजे, खुद्द शरद पवारांच्याच वेगवेगळ्या भूमिका. आधी सावरकर, नंतर अदानी प्रकरण आणि आता मोदींच्या डिग्रीवर पवारांचे वेगळे सूर दिसतायत.

मुंबई : गेल्या आठवड्याभरापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्यात, ज्या ठाकरे गट आणि काँग्रेसच्या मतापेक्षा वेगळ्या आहेत. आतापर्यंत 3 विषयांवर शरद पवारांनी रोखठोक भूमिका घेतलीय. पहिला विषय आहे, सावरकरांचा. पवारांनी इथं काँग्रेसच्या विशेषत: राहुल गांधींच्या विरोधी भूमिका घेतली. राहुल गांधींच्या टीकेनंतर, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंच्या घरी झालेल्या बैठकीत पवारांनी सावरकरांना माफीवीर म्हणणं योग्य नाही. सावरकर आणि संघाचा काहीही संबंध नाही, असं मत मांडलं.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !

दुसरा विषय आहे, अदानी प्रकरणाचा. इथं पवारांनी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या विरोधी भूमिका घेतली. अदानी प्रकरणावरुन 19 विरोधी पक्ष जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशीची मागणी करत आहेत. त्यावरुन संसदीय अधिवेशन चाललं नाही. मात्र पवारांनी जेपीसी चौकशीऐवजी कोर्टाच्या समितीद्वारेच चौकशी योग्य असल्याचं म्हटलं.

तिसरा विषय आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीचा. इथं पवारांनी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या विरोधी भूमिका घेतलीय. पंतप्रधान मोदींची डिग्री बोगस असल्याचा आरोप विरोधकांचा आहे. त्यावर मोदींनी स्पष्टीकरण द्यावं, असं ठाकरे गट आणि काँग्रेसचही म्हणणंय. पण मोदींची डिग्री हा राष्ट्रीय मुद्दा नाही, असं पवार म्हणालेत.

शरद पवार यांच्यापाठोपाठ अजित पवारांनीही डिग्रीवरुन सवाल उपस्थित करणाऱ्यांचेच कान टोचलेत. 2014 मध्ये मोदींची डिग्री पाहून निवडून दिलं का? मोदींनी आपला करिष्मा सिद्ध केला, असं अजित पवार म्हणालेत. पवारांच्या या भूमिका काँग्रेस आणि ठाकरे गटा विरुद्ध आहेत. पण भाजपच्या बाजू घेणाऱ्या आहेत का? यावरुनही चर्चा सुरु झालीय.

विशेष म्हणजे अदानी प्रकरणावरुन तर काँग्रेस देशभरात आक्रमक झालीय. मात्र पवारांनी जेपीसी चौकशी पेक्षा, सुप्रीम कोर्टाच्या समितीद्वारेच चौकशी हवी, असं परखड मत व्यक्त केलं, ज्या भूमिकेचं भाजपनंही स्वागत केलं. पण त्यावरुन महाविकास आघाडीतले मतभेद उघड झाले. शरद पवारांच्या भूमिकेवरुन आता, मोदींच्या संसदेतल्या वक्तव्याचीही चर्चा सुरु झालीय. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात काँग्रेसवर हल्लाबोल करताना मोदींनी पवारांचं कौतुक केलं.

हे झालं शरद पवारांचं. पण अजित पवारांनीही EVM मशिनवरुन वेगळं मतं मांडलंय. EVM ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्या, असं काँग्रेसही म्हणतेय आणि ठाकरे गटही. मात्र अजित पवारांनी EVMला दोष देण्यात काहीही अर्थ नसल्याचं म्हटलंय. विरोधक म्हटलं की एकमत आवश्यक आहे. एखाद्या विषयावर मतभेद असूही शकतात. पण इथं चार चार विषयावर मतभेद उघड झालेत. त्यामुळे महाविकास आघाडीत काय सुरु आहे? असा सवाल विचारण्यास वाव आहे.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !