संकष्टी चतुर्थी: 70 हजार भाविकांनी घेतले मयूरेश्‍वराचे दर्शन..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मोरगाव – अष्टविनायकापैकी प्रथम तीर्थक्षेत्र असलेले मोरगाव (ता. बारामती) येथे रविवारी सुट्टीच्या दिवशी आलेल्या संकष्टी चतुर्थीनिमित्त राज्यभरातील भाविकांनी मयूरेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.

पहाटे पाच वाजल्यापासून भक्तांनी मयुरेश्वर दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत सुमारे 70 हजारांपेक्षा अधिक भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.

रविवार (दि.9) संकष्टी चतुर्थीनिमित्ताने पहाटे गुरव मंडळींची प्रक्षाळ पूजा झाल्यानंतर मंदिराचा मुख्य गाभारा सर्व भक्तांना दर्शनासाठी खुला करण्यात आला. ही चतुर्थी सुट्टीतील व रविवारी आल्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्तगणांनी मयुरेश्वराच्या दर्शनासाठी सुरू गर्दी केली होती. सकाळी सात वाजता सालकरी विजय ढेरे यांनी श्रींची पूजा केल्यानंतर देवस्थानच्या वतीने नैवद्य दाखविण्यात आला. सकाळी सातनंतर गर्दीचा ओघ पुन्हा वाढला. दिवसभर तप्त उन्हातही भाविकांनी रांगा लावल्या होत्या.

दुपारी बारा वाजता चिंचवड देवस्थानच्या वतीने श्रींची पूजा केल्यानंतर खिचडीचा महाप्रसाद सुरू करण्यात आला. देवस्थानच्या नुकत्याच झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये व्हीआयपी दर्शन सुविधा संदर्भात निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार अवघ्या शंभर रुपयांमध्ये थेट दर्शन सुविधा सुरू केली असल्याची माहिती विश्‍वस्त विनोद पवार यांनी दिली. मंदिर परिसरातील दुकाने भाविकांच्या गर्दीमुळे भरगच्च भरली होती. तप्त उन्हामुळे शीतपेयांना प्रचंड मागणी वाढलेली होती. रात्री चंद्रोदयाच्या वतीने वेळी आरती झाली. याप्रसंगी शेकडो भक्तगण उपस्थित होते. यानंतर श्रींस महानैवेद्य दाखवण्यात आला.