शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये खुनाचे दोन गुन्हे दाखल

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पुणे : शहर पोलिस हद्दीतील ४४ पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये दिवसाला एक तरी खून होत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे.
कुठे कोयता गँगची दहशत तर कुठे रेकॉर्डवरील गुन्हेगारांची. पण दररोजच्या खूनांच्या घटनांमुळे पुणे शहराची प्रतिमा मलिन होत असून, पोलिस आयुक्तांनी हे गुन्हे कशाप्रकारे थांबतील याकडे सर्वाधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. ५ एप्रिल रोजी शहरात दोन खुनाचे गुन्हे तर एक जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील पहिल्या घटनेत किरकोळ भांडणाच्या रागातून चार अल्पवयीन बालकांनी एका अल्पवयीन मुलाचा तीक्ष्ण हत्यारासह चाकूने डोक्यात वार करून खून केला. ही घटना भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौजे मांगडेवाडी येथील ओढ्याशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत घडली. याप्रकरणी मुकेश इंगळे (४५, रा. कात्रज) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या १७ वर्षीय मुलाला मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून जीवे मारण्यात आले. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक वर्षा तावडे या करत आहेत.

दुसऱ्या घटनेत नवऱ्याने बायकोच्या चारित्र्यावर संशयाच्या कारणावरून खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रंदावणी राजेभाऊ पारखे (३६) या विवाहितेला तिचा नवरा राजेभाऊ किसन पारखे (४२, रा. थिटेवस्ती, खराडी) याने चारित्र्याच्या संशयावरून १२ मार्च रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास जबर मारहाण केली होती. यानंतर रंदावणी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून बऱ्या होऊन त्या घरी देखील गेल्या होत्या, मात्र त्यानंतर त्यांचा ५ एप्रिल रोजी मृत्यु झाला. यानंतर राधाबाई कठाळु नाटकर (५३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जावई राजेभाऊ विरोधात खूनाच्या उद्देशाने कुकरने डोक्यात मारून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक खांडेकर करत आहेत.

तिसऱ्या घटनेत रात्री बाराच्या सुमारास घरातून औषध आणण्यासाठी नळस्टॉप येथे गेलेल्या २१ वर्षीय तरूणाला तिघांनी जुन्या भांडणाच्या रागातून शस्त्राने वार करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी जखमी आर्यन निनाद थत्ते (२१, रा. लॉ कॉलेज रोड, ३०१ आमृत आपार्टमें) याने दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मीपुत्र नागेश बडदाळ (२३, रा. कर्वेनगर), समीर शकील अन्सारी (२५, रा. दत्तवाडी) आणि राहूल राजू थोरात (२४, रा. दत्तवाडी) या तिघांनी ५ एप्रिल रोजी आर्यन मध्यरात्री नळस्टॉप येथे औषण आणण्यासाठी गेला असताना जून्या भांडणाच्या कारणावरून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात आर्यन गंभीर जखमी झाला. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सतपाळे करत आहेत.