ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाहेरील औषधं लिहून देण्यास ससूनमधील डॉक्टरांना बंदी; सर्व औषधं मोफत मिळणार


डॉक्टरांनी रुग्णांना बाहेरची औषधे लिहून देऊ नयेत, (Sassoon Hospital) यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार संचालित ससून हॉस्पिटल पुणे यांनी उपाययोजना केल्या आहेत.



रूग्णांना स्वतःची औषधे, सिरिंज किंवा इतर वैद्यकीय साहित्य खरेदी करावे लागणार नाही, याची खात्री करण्यासाठी रूग्णालयात 255 आवश्यक औषधे आणि 480 वारंवार लिहून दिलेली औषधे आता रुग्णालयाकडूनच उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. सरकारी रुग्णालयात येणारे रुग्ण सामान्यतः आर्थिक दृष्या सक्षम नसतात आणि त्यांना स्वतःच्या औषधांसाठी पैसे देण्यास सांगणे अस्वीकार्य आहे, असे बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांनी सांगितले. त्यामुळे आता सगळ्यांना मोफत औषधं मिळणार आहेत.

रूग्णालयातील डॉक्टर रूग्णांना आवश्यक औषधे खरेदी करण्यासाठी रूग्णालयाच्या बाहेरील फार्मसीमध्ये पाठवत होते. ज्यामुळे अनेकांना त्यांच्यासाठी पैसे जमा करावे लागत होते. त्यामुळे डॉक्टरांनी बाहेरची औषधे लिहून देऊ नयेत यासाठी BJGMC आणि ससून हॉस्पिटलने हॉस्पिटलमध्ये आवश्यक औषधांचा साठा करण्याची व्यवस्था केली आहे. रुग्णालयाने नवीन औषधे खरेदी केली आहेत आणि जुनी अपग्रेड केली आहेत, डॉक्टरांना अद्ययावत औषधे उपलब्ध आहेत, याची खात्री करून दिली आहे, असं डॉ. ठाकूर यांनी सांगितलं आहे.

बाहेरून औषधे लिहून दिल्यास डॉक्टर आणि विभागप्रमुखांवर कारवाई होईल. काही महत्वाच्या केसेसमध्येच प्रिस्क्रिप्शनला परवानगी दिली जाईल. औषधे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यासाठी रुग्णालयाच्या औषध दुकानाजवळ कर्मचारी नियुक्त केले जातील. यात काही चुकीचा प्रकार आढळल्यास योग्य कारवाई करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयात पुणे जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील अनेक भागातून ससून रुग्णालयात उपचारासाठी रुग्ण येत असतात. उत्तम आणि कमी खर्चात उपचार होतात. त्यामुळे अनेक नागरिक ससून रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. आर्थिक दृष्ट्या सक्षम नसणारे नागरीक आणि सर्वसामान्य नागरिक रुग्णालयात उपचारासाठी जास्त प्रमाणात येतात. याच नागरिकांना बाहेरील औषधं डॉक्टरांकडून लिहून दिली जात होती. त्यामुळे अनेक नागरिकांना या औषधांसाठी पैसे गोळा करणं शक्य होत नव्हतं. परिणामी नागरिक आणि रुग्णांना पैशासाठी वणवण करावी लागत होती. त्यामुळे ससून रुग्णालयातील डीनकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

रुग्णांना दिलासा…

बाहेरील औषधं लिहून दिल्याने अनेक नागरिकांना ही औषधं घेण्यासाठी फिरावं लागत होतं. सगळेच रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक पुण्यातील नसून बाहेरील शहरातील असतात. त्यामुळे त्यांना शहरासंदर्भात फार माहिती नसते त्यामुळे त्यांनाही त्रास सहन करावा लागतो. या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button