“गुंडांचं सरकार महाराष्ट्रात राहू देणार नाही..” आदित्य ठाकरेंची ठाण्यात गर्जना
रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी पोलीस काय करत आहेत? असा प्रश्न विचारत महाविकास आघाडीने आज ठाण्यात मोर्चा काढला आहे. आम्ही पोलीस आयुक्तालयाला कुलुप लावणार आहोत असाही निर्धार यावेळी राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी बोलून दाखवला आहे.
तसंच रोशनी शिंदे यांना न्याय मिळालाच पाहिजे असंही या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह प्रमुख नेते या मोर्चात सहभागी झाले आहेत. गुंडाचं सरकार आम्ही महाराष्ट्रात राहू देणार नाही असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
मोर्चा किती भव्य आहे ते महत्त्वाचं नाही तर मोर्चा कशासाठी निघतोय ते महत्त्वाचं आहे. जो कायदा पोलिसांनी पाळला पाहिजे तो कायदा पायदळी तुडवला जातो आहे. आयपीएस होताना पोलीस शपथ घेतात की निःपक्षपातीपणाने कारभार करेन. ते कधीही दिसतच नाही. एका समूहावर कायम अन्याय करण्याची प्रवृत्ती दिसते आहे. त्यामुळेच आम्ही हा मोर्चा काढला आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरेंनी काय म्हटलं आहे?
रोशनी शिंदे यांना मारहाण केली जाते हा अत्यंत घृणास्पद प्रकार ठाण्यात घडला आहे. आमचा लढा अन्यायाच्या विरोधात आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत. ठाण्याचे पोलीस आयुक्त हे बेपत्ता आहे. गुंडांचं सरकार आलं आहे आम्ही ते सरकार महाराष्ट्रात राहू देणार नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
नरेश म्हस्केंनी काय म्हटलं आहे?
नरेश म्हस्के यांनी मोर्चावर कडाडून टीका केली आहे. ज्या जितेंद्र आव्हाडांनी उद्धव ठाकरेंचा फोटो खड्ड्यात बुडवला होता. ज्या जितेंद्र आव्हाडांनी बाळासाहेब ठाकरेंवर चुकीच्या शब्दांमध्ये टिपण्णी केली होती अशा आव्हाडांना सोबत घेऊन मोर्चा काढला जातो आहे. उद्धव ठाकरेंकडे माणसं नाहीत ठाण्यात आणायला त्यामुळेच मुंबई, रायगड या ठिकाणांहून माणसं आणली गेली आहेत. जो खोटा आव आणत आहेत तो बुरखा फाटला आहे. मारहाण झालेली नाही असं सिव्हिल रूग्णालयाने सांगितलं आहे त्यामुळे हे असत्य ठारले आहे असंही नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.