नऊ कोटींचे कर्जप्रकरण: बँक मॅनेजरची आत्महत्या, कर्ज घेणाऱ्या उद्याेजकाविरुद्ध गुन्हा

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मुंबई: (आशोक कुंभार )दादरच्या नामांकित बँकेतीलबँक मॅनेजर संदेश मालपाणी यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वायुदूत मल्टीसर्व्हिसेस प्रा. लि.
कंपनीच्या संचालकाविरुद्ध पार्क साईट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वायुदूतने बॅंकेकडून ८ कोटी ८४ लाखांचे कर्ज मंजूर करून घेतल्यानंतरही तारण ठेवलेल्या मालमत्तेची कागदपत्रे जमा न केल्याने वरिष्ठांनी मालपाणी यांनाच जबाबदार धरल्याच्या मानसिक तणावातून त्यांनी आयुष्य संपविल्याच्या आरोपातून पोलिस अधिक तपास करत आहेत.

विक्रोळी पश्चिमेकडील परिसरात मालपाणी हे कुटुंबीयांसोबत राहण्यास होते. १२ मार्चला इमारतीतून उडी घेत त्यांनी आयुष्य संपविले. पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, आत्महत्येपूर्वी काही दिवसांपासून ते तणावात होते. कामाच्या ठिकाणी जास्त ताण असल्याचे त्यांनी पत्नीला सांगितले होते. पोलिसांना मालपाणी यांनी लिहिलेली सुसाईड नोटही मिळाली आहे. यात संदेश यांनी आपल्या आत्महत्येस वायुदूत मल्टीसर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीचे शांकी अग्रवाल हे जबाबदार असल्याबाबत नमूद केले होते. तसेच, संदेश यांनी त्यांच्या बँकेतील सहकारी अमान, सोनाली आणि नायर नावाच्या व्यक्तींचाही उल्लेख केला होता. पोलिसांनी घटनेची नोंद करून ही सुसाईड नोट ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

आयसीआयसीआय बॅंकेकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी वायुदूत मल्टीसर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीने संदेश मालपाणी मॅनेजर असलेल्या राष्ट्रीयीकृत बॅंकेकडून ८.८४ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले होते. यासाठी कंपनीने गोरेगावमधील दुकान आणि पुण्यातील फ्लॅट अशी मालमत्ता तारण ठेवली होती.