ठाणे जिल्ह्यात पुन्हा करोनाची धास्ती

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


ठाणे : मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात करोनाचे रुग्ण आढळून येत नव्हते. यामुळे नागरिकांसह आरोग्य यंत्रणेनेही सुटकेचा निःश्वास सोडला होता. असे असतानाचा आता मार्च महिन्याच्या सुरवातीपासून जिल्ह्यात करोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने आणि देशात ‘एच३एन२’ या विषाणूचा शिरकाव झाल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे.
मागील दोन आठवड्यांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल १२६ रुग्ण आढळून आले असून यातील ७१ रुग्ण हे ठाणे शहरातील आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागातर्फे नागरिकांना मुखपट्टी वापरण्याचे आवाहन करण्यात आले असून, करोना चाचण्याही वाढविण्यात येत आहेत. तर वारंवार होत असलेल्या वातावरणातील बदलांमुळे नागरिकांमध्ये साथीच्या आजाराचे प्रमाणही वाढले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

डिसेंबर महिन्याच्या अखेरनंतर जिल्ह्यात केवळ एक ते दोन करोना बाधित रुग्ण आढळून येत होते. तर हळूहळू हे प्रमाण शून्यावरही गेले होते. यामुळे जिल्ह्यातील करोनाची साथ पूर्णपणे आटोक्यात आल्याचे एक सकारात्मक चित्र दिसून आले होते. यामुळे सामान्य नागरिकांसह जिल्ह्यातील विविध पालिकांच्या आरोग्य यंत्रणांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मागील वर्षी मार्च महिन्यात सर्वत्र करोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून आले होते. त्याच पद्धतीने त्यावेळेसही करोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ होऊ लागली आहे. यामुळे नागरिकांसह प्रशासनाच्या चिंतेतही चांगलीच भर पडली आहे. मागील पंधरा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात १२६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर यातील ७१ रुग्ण हे ठाणे शहरातील आहे. तर इतर शहरांमध्येही हळूहळू रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. यामुळे जिल्हा आरोग्य विभागाकडून नागरिकांना खबदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणे विना कारण जाणे टाळावे, तर अशा ठिकाणी वावरताना मुखपट्टीचा वापर आवर्जून करावा. याबरोबरचा नागरिकांनी थंडी, ताप, सर्दी, घसादुखी यांसारखी लक्षणे असल्यास लागलीच नजीकच्या दवाखान्यात जाऊन वेळीच उपचार घ्यावे, असे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

वातावरणातील बदल त्रासदायक

सकाळी थंड, दुपारी उष्ण असे वातावरण मागील काही दिवसांपासून आहे. तर यात भर म्हणून मध्येच पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात काही काळ गारवा पसरत आहे. अशा विचित्र वातावरणामुळे नागरिक मागील दहा ते पंधरा दिवसांपासून घसादुखी, खोकला, सर्दी, ताप यांसारख्या साथीच्या आजाराने त्रस्त आहे. यामुळे जिल्ह्यातील विविध दवाखान्यांमध्ये अशा साथीच्या आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांची गर्दी दिसून येत आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ९८ इतकी आहे. यातील ९१ रुग्णांवर घरीच उपचार सुरू असून ७ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर जिल्ह्यात दररोज २५० ते ३०० करोना चाचण्या केल्या जात असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढताना दिसून येत असली तरी सर्व बाधितांना सौम्य लक्षणे आहेत. सध्या ठाणे जिल्ह्यात तरी ‘एच३एन२’ विषाणू बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र आरोग्य यंत्रणांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. वातावरणातील बदल ही काही अंशी साथीच्या आजारांचे मुख्य कारण ठरत असल्याचेही दिसून येत आहे, असे ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार म्हणाले.