क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

बनावट नोटा खपविण्यासाठी आलेल्या कुटुंबाला घेतले ताब्यात


इचलकरंजी : (अशोक कुंभार )कबनूर (ता. हातकणंगले) येथे बनावट नोटा खपविण्यासाठी कारमधून आलेल्या एका परिवारातील तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडून ५००, २०० व ५० रुपयांच्या २३ हजार ५०० रुपये किमतीच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या. त्यांनी या नोटा कोठून आणल्या, याबाबत अधिक तपास सुरू आहे.राजन नामदेव काळोखे (वय २९), पुतळाबाई नामदेव काळोखे (५१) आणि धनश्री राजन काळोखे (२२, सर्व रा. महादेववाडी, ता. माढा, जि. सोलापूर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शहरातील कबनूरकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील चहाच्या टपरीवर मंगळवारी दुपारी कारमधून उतरलेल्या दोघींनी ५०० रुपयांच्या मोडीची मागणी केली. त्यांच्यासोबत एक लहान मूलही होते.

त्यावेळी काहींना त्यांचा संशय आल्याने नागरिकांनीच त्यांच्यावर पाळत ठेवली. हे कुटुंबीय कबनूरकडे निघाले असता त्यांना अडवून नागरिकांनी चौकशी केली. त्यामध्ये त्यांच्याकडे बनावट नोटा असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांना घेऊन नागरिक शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आले. तेथे पोलिसांनी अधिक तपास केला असता त्यांच्याकडे वरीलप्रमाणे बनावट नोटा आढळल्या.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे कुटुंबीय कबनूर येथील उरुसानिमित्त तेथे फेरीवाले, फुले, हार विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते अशा छोट्या व्यावसायिकांची गर्दी होऊ लागल्याने त्याचा गैरफायदा घेत नोटा खपविण्यासाठी आले होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून, त्यांचे नेमके कोणत्या टोळीशी संबंध आहेत का, याबाबत रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. प्राथमिक तपासानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी सांगितले.

सोलापूर कनेक्शन?

सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथे एका बनावट नोटांच्या छापखान्यावर तीन महिन्यांपूर्वी पोलिसांनी कारवाई केली होती. त्यामुळे त्यांच्याशी काही कनेक्शन जुळते का, याचीही तपासणी पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होती.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button