“मुख्यमंत्री जिथे-जिथे जाणार तिथे भाजपाचा.”, रवींद्र धंगेकरांचं मोठं विधान

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पुणे:(आशोक कुंभार )मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिथे-जिथे जातील तिथे, त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात राग आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं सरकार ज्या पद्धतीने पायउतार झालं, त्याचा जनतेत प्रचंड राग आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे जिथे-जिथे जाणार, तिथे भाजपाचा पराभव होणार आहे, असं मत कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केलं.

“अजित पवार, नाना पटोले, आदित्य ठाकरे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि अन्य नेत्यांनी कसबा पेठ निवडणुकीत ताकदीने काम केलं. महाविकास आघाडी एकत्र लढली, ही भाजपाच्या पराभवाची नांदी सुरु झाली आहे,” असं रवींद्र धंगेकरांनी म्हटलं.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवरच ईडीच्या धाडी पडतात, याबद्दल विचारलं असता, रवींद्र धंगेकर म्हणाले, “ती वस्तुस्थिती असून, ते लपून राहिलं नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना धाक दाखवून भाजपात घेतलं गेलं. नेते गेले म्हणून जनता थोडीच जाणार आहे. जनतेवर ईडी लावणार का? त्यांच्यावर खटले भरणार का? नेते बदलू शकतात, मतदार बदलू शकत नाही.”

२०२४ साली होणाऱ्या विधानसभेची निवडणुकीची तयारी भाजपाने केली आहे. तुमची रणनिती कशापद्धतीने असणार? असं विचारलं असता धंगेकरांनी सांगितलं, “पाच वर्षात महापालिका, देश आणि राज्याचा कारभार सर्वांनी पाहिला आहे. जे स्वप्न दाखवलं होतं, ते जादूगारासारखं असून, सत्यात उतरलं नाही. सर्वसामान्य माणसाला आपण कितीवेळा फसवू शकतो. जनता दुधखूळी नाही.”

“जनतेला गॅसचे भाव, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत माहिती आहे. अन्यही प्रश्नांबद्दल लोकं चिंतेत आहेत. मात्र, सध्याचं राजकारण पाहून आमच्यासारखे कार्यकर्ते भयभीत झाले आहेत. उद्या ते काहीही करू शकतात. त्याला सामोरं जाण्यासाठी सर्व लोकं तयार आहेत. आपल्याकडे लोकशाही आहे. त्यामुळे ती जिवंत राहण्यासाठी सज्जनांच्या मागे जनता उभी राहते,” असेही धंगेकरांनी म्हटलं.