विवाहितेची घरातील पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या..
शिरूर शहरातील सूरजनगर परिसरात राहणाऱ्या विवाहितेने घरातील पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. भाग्यश्री रामेश्वर दामूवाले (वय २७) असे या आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
या विवाहितेचे पती रामेश्वर बळिराम दामूवाले यांनीच या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. या आत्महत्येमागील नेमके कारण समजू न शकल्याने शिरूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे भाटसांगवी (ता. चाकर, जि. लातूर) येथील दामूवाले दांपत्य कामाच्या निमित्ताने गेल्या काही महिन्यांपासून शिरूरमधील सूरजनगर परिसरात भाड्याने खोली घेऊन राहात होते.
सोमवारी (ता. २०) रात्री जेवणखाण करून हे दांपत्य मुलांसह बेडरूममध्ये झोपल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास भाग्यश्री दामूवाले या मुलांना घेऊन हॉलमध्ये झोपायला गेल्या. मंगळवारी (ता. २१) पहाटेच्या सुमारास मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने रामेश्वर दामूवाले यांनी हॉलमध्ये येऊन पाहिले असता, त्यांच्या पत्नी भाग्यश्री यांनी हॉलमधील छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे घाबरलेल्या रामेश्वर यांनी सीमा पठारे, संजय तरटे, सचिन चाबुकस्वार, गजानन ढुमणे या शेजाऱ्यांना हाक मारून बोलावले. सर्वांच्या मदतीने त्यांनी पत्नीचा गळफास काढून त्यांना जवळच्याच वेदांता हॉस्पिटलमध्ये आणले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.