गवताच्या झोपडीला आग,तीन चिमुकल्यांचा होरपळून जागीच मृत्यू
आपल्या पोटच्या लहान लेकरांना घरात सोडून रोजच्या पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण करावी लागते. अश्याच एका आईला आपल्या लेकरांना घरी एकत सोडून कामावर जाणं अत्यंत वेदनादायी ठरल आहे.
शेतात बांधलेल्या गवताच्या झोपडीला अचानक आग लागली. या आगीत झोपडीत खेळत असलेल्या तीन चिमुकल्यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्ख्या बहिण भावांचा समावेश असून त्यांच्याच कुटुंबातील आणखी एक मुलगी सुद्धा जीवास मुकली आहे.
राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील वांद्रे गावात बुधवारी दुपारच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. या घटनेमुळे मृत मुलांच्या मजूर आईला जबर धक्का बसला असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सरूपी सिंह (४) अशोक सिंह (२), रुकमा सिंह (७) अशी मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलांचे आई-वडील शेतात मोलमजुरी करतात. बुधवारी ते गावातील एका व्यक्तीच्या शेतात मजुरीसाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची दोन मुलं आणि कुटुंबातील एका व्यक्तीची एक चिमुकली मुलगी सुद्धा होती. उन्हाच्या झळा लागत असल्याने आईने या मुलांना शेतातील गवताच्या झोपडीत बसवून दिलं. मुलं झोपडीत खेळत असताना, अचानक झोपडीला आग लागली. बघता-बघता या आगीने रौद्ररुप धारण केलं. झोपडीपासून दूर असलेल्या मुलांच्या आई-वडीलांना ही आग दिसली. मात्र, ते येण्याच्या आधीच झोपडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. पोटच्या गोळ्यांना आपल्या डोळ्यादेखत होरपळताना बघून आईसह वडिलांना देखील मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, गावकऱ्यांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही मुलांचे मृतदेह स्थानिक रुग्णालयाच्या शवागारात ठेवले. मृतांमध्ये दोन निष्पाप मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. ही आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र, प्राथामिक माहितीनुसार, यातील एका मुलाने झोपडीत असलेली आग पेटी पेटवली. त्यामुळे झोपडीला आग लागली. आग लागल्यानंतर मुलांना बाहेर पडता आले नाही. मन सुन्न करणाऱ्या या घटनेनं सर्वत्र शोककळा पसरली आहे.