Diamond : कोहिनूरपेक्षा मोठा हिरा, निजामाने बुटात ठेवला होता; आजही आहे भारतात पण मालक कोण?
Diamond : सध्या टॉवर ऑफ लंडन येथे असलेला कोहिनूर हिरा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण कोहिनूरपेक्षा दुप्पट मोठा असलेला एक हिरा आजही भारतात आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? हा हिरा हैदराबादच्या निजामाकडे होता.
निजाम हा एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत माणूस होता. पण हा हिरा खास आहे त्याचं कारण वेगळंच आहे. निजाम त्याच्यापासून सतत दूर राहात असे. त्याने हा हिरा चक्क आपल्या एका जुन्या बुटामध्ये लपवून ठेवला होता, जेणेकरुन तो दृष्टीलाच पडू नये. हा हिरा ‘जेकब डायमंड’ म्हणून ओळखला जातो. त्याचीही एक गोष्टच आहे. निजामाला हा हिरा ज्याच्याकडे मिळाला तो एक व्यापारी होता आणि त्याचं नाव होतं जेकब. या जेकबचं व्यक्तीमत्त्व अत्यंत रहस्यमय होतं. तो स्वतःला जोहरी, ज्योतिषी, जादूगार, विद्वान, लेखक आणि व्यापारी असं सगळं काही समजत असे. आज आम्ही तुम्हाला या जेकब डायमंडबद्दल माहिती देणार आहोत.
जेकब डायमंडची गोष्ट ही खरं तर तीन रंजक व्यक्तीमत्वांची गोष्ट आहे. ते तिघे जण म्हणजे हैदराबादचे सहावे निजाम महबूब अली खान, त्यांचा अर्मेनियन सेवक अल्बर्ट आबिद आणि अलेक्झांडर मॅल्कम जेकब नावाचा एक रहस्यमयी जोहरी हे होत. 1890 च्या दशकात या जेकब डायमंडने भरपूर वाद निर्माण केला होता.
असं म्हणतात की एकेकाळी भारत हा जगाचं ‘डायमंड कॅपिटल’ होता. चाणक्याच्या अर्थशास्त्र ग्रंथांमध्ये ईसवी सन पूर्व चौथ्या शतकापासून देशातील हिऱ्यांचा उल्लेख आढळतो. हैदराबादच्या जवळपास कृष्णा नदीच्या परिसरातील एका गुप्त भागाला ‘हीरों की घाटी’ असं म्हटलं जात असे. बहुतांश हिरे हे आजच्या आंध्र प्रदेशात असलेल्या कृष्णा गोदावरी पट्ट्यात सापडल्याचे उल्लेखही आहेत. ‘द ॲडव्हेंचर्स ऑफ सिंदबाद’ सारख्या बेस्ट सेलर पुस्तकातही या हीरों की घाटीचा उल्लेख आहे. या दरीत अत्यंत विषारी साप राहात असत. चतुर हिरेव्यापारी मोठमोठाले मांसाचे तुकडे या दरीत टाकत असत. त्यांना हिरे चिकटत असत. त्यानंतर प्रशिक्षित गरुड सोडून हे मांसाचे तुकडे आणि पर्यायाने त्यांना चिकटलेले हिरे मिळवले जात असत अशा आख्यायिका सांगितल्या जातात.
मार्को पोलो हा प्रवासी भारतात आला तेव्हा 1293 मध्ये त्याने आंध्र प्रदेशचा दौरा केला. त्यानेही आपल्या प्रवास वर्णनांमध्ये इथल्या हिऱ्यांचा उल्लेख केला आहे. 16 व्या शतकापर्यंत भारतीय हिरे हे गोवळकोंडा या कुतुबशाही साम्राज्याच्या नावाने म्हणजेच गोवळकोंडी हिरे म्हणून ओळखले जात असत. अनेकांना कृष्णा नदीच्या काठावरील मातीत हिरे आढळल्याचं सांगितलं जातं. मात्र, त्या काळात एका विशिष्ट आकारापेक्षा मोठा असलेला हिरा राजाच्या खजिन्यात जमा करण्याचा नियम होता. 18 व्या शतकापर्यंत कृष्णा परिसरातील हिरे संपले. याच काळात दख्खनचा मुघल व्हाईसरॉय मीर कमरुद्दीन खान याने आपलं राज्य स्थापन केलं आणि 1724 मध्ये स्वतःला निजाम म्हणून घोषित केलं. दख्खनमधील अमाप संपत्तीमुळे निजाम आणि त्यांचे वंशज हे जगातील सर्वांत श्रीमंत लोक ठरले.
हैदराबादचे सहावे निजाम असलेले मीर महबूब अली खान हे 1869 मध्ये सगळ्यात श्रीमंत आणि शक्तिशाली राज्याच्या गादीवर विराजमान झाले. त्यांना उंची वस्तूंचा शौक होता. हिरे त्यांना विशेष आवडत असत. अल्बर्ट आबिद हा त्यांचा अत्यंत विश्वासू सेवक होता. डीएफ कराका या इतिहासकाराने असं लिहिलंय की निजाम कपडे बदलतानाही अल्बर्ट आबिद तिथे उपस्थित असे. निजामाचे कपडे, बूट, घड्याळं, आभूषणं हे सगळं तो सांभाळत असे. निजाम कधीही एकदा वापरलेले सूट्स परत वापरत नसल्यामुळे त्याच्या या विश्वासू सेवकाची चांगलीच चैन होत असे. तो असे सूट्स एक तर स्वतःसाठी ठेवत असे किंवा काही दिवसांनी चक्क निजामालाच परत विकत असे. अशा प्रकारे निजामाला फसवून त्याने प्रचंड पैसे मिळवले आणि हैदराबादमध्ये एक मोठ्ठं दुकान टाकलं. आता ते दुकान नाही; पण आबिद स्क्वेअर अशी जागा मात्र आजही आहे. कोणीही व्यापारी आला की त्याला निजामापर्यंत पोहोचायचं असेल तर आबिदला बरीच लाच द्यावी लागत असे. निजामाला एखादी गोष्ट पसंत पडली तर किमतीवर चर्चा न करता ती वस्तू खरेदी केली जात असे.
हैदराबादमध्ये हे असं सगळं चाललेलं असताना तिकडे शिमल्यात अलेक्झांडर माल्कम जेकब नावाचा एक प्रसिद्ध व्यापारी होता. ब्रिटिशकालीन भारतात तो एक बडं प्रस्थ मानलं जात असे. तो कुठून आला, काय करतो हे फार कमी लोकांना माहिती होतं. तो रशियन गुप्तहेर आहे, अशीही चर्चा होती. काहींच्या मते तो जादुगार होता. शिमल्यात त्याचं वास्तव्य होतं आणि मोठमोठे ब्रिटिश अधिकारी किंवा राजेमहाराजांना तो दागिने आणि अँटिक वस्तू विकत असे. हैदराबादचा निजामही जेकबचा खास ग्राहक होता. 1891 मध्ये जेकब आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या सौद्याची तयारी करत होता. दक्षिण आफ्रिकेत सापडलेला 184.75 कॅरेटचा इंपिरिअल हिरा 21 लाखांना खरेदी करायचा आणि निजामाला 50 लाखांना विकायचा असा जेकबचा डाव होता. हा सौदा झाला तर कमिशन म्हणून तो आबिदला पाच लाख रुपये देणार होता.
हा हिरा भारतात आणण्यासाठी निजामाने जेकबला 23 लाख रुपये दिले मात्र हिरा आवडला की नाही हे आपण ठरवणार अशी अट घातली. जेकबने हिरा भारतात आणला आणि निजामासमोर पेश केला. तेव्हा निजामाने चक्क तो हिरा पसंत नसल्याचं म्हटलं. यानंतर मोठा गदारोळ झाला. निजामाने हिरा भारतात आणण्यासाठी आपण दिलेले पैसे जेकबकडे परत मागितले. प्रकरण कोर्टात गेलं. ते बराच काळ चाललं. जेकबने पैसे परत न केल्यामुळे तो हिरा निजामाकडेच राहिला. मात्र, हा हिरा हैदराबादमध्ये अशुभ ठरवण्यात आला. या व्यवहारात जेकबचा हात मात्र चांगलाच पोळला.
या हिऱ्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागल्यामुळे निजामाचं मन या जेकब डायमंडवरुन उडालं होतंच. त्याने मळक्या कपड्यांमध्ये गुंडाळून तो चक्क आपल्या जुन्या बुटामध्ये ठेवला. पुढे सातव्या निजामाने मीर उस्मान अली खानने तो पेपरवेट म्हणून वापरला. काही वर्षांनी हा हिरा एका ट्रस्टकडे सोपवण्यात आला. 1995 मध्ये भारत सरकारने तो ताब्यात घेतला. सध्या मुंबईत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीत तो सुरक्षित ठेवण्यात आलेला आहे. या प्रकरणात जेकबने आपली विश्वासार्हता गमावली. त्याचे ग्राहक त्याला दुरावले आणि त्याची प्रतिष्ठाही संपुष्टात आली.