डेंग्यू म्हणजे नेमकं काय?डेंग्यू झाल्यावर कशी काळजी घ्यावी?
विविध साथीच्या रोगांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यात डेंग्यूच्या साथीचादेखील समावेश असतो. महाराष्ट्रातही दरवर्षी डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असतात.
यंदाही तेच चित्र पाहायला मिळत आहे.
डेंग्यू म्हणजे नेमकं काय?
डेंग्यू हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होणारा विषाणूजन्य आजार आहे. प्रामुख्यानं डासांची एडिस इजिप्ती ही प्रजाती डेंग्यू पसरवण्यास कारणीभूत असते.
महाराष्ट्र आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी याबाबत बीबीसीबरोबर बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.
डेंग्यूलाच बोनब्रेक फिव्हर किंवा (हाडं मोडून काढणारा ताप) असंही म्हटलं जातं. या तापामुळं काही जणांना हाडं आणि स्नायूंच्या प्रचंड वेदनांचा सामना करावा लागतो.
डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतूनाशकांची फवारणी आवश्यक आहे.
प्रामुख्यानं NS-1, Igm आणि IGG या तीन चाचण्यांच्या माध्यमातून डेंग्यूचं निदान होतं, अशी माहिती भोंडवे यांनी दिली.
यात प्रामुख्याने दोन प्रकार असतात. डेंग्यू ताप (डी.एफ.) आणि डेंग्यू रक्तस्त्रावी ताप (डी.एच.एफ.). यातील दुसऱ्या प्रकारच्या तापामुळं गंभीर स्थिती निर्माण होऊन, जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.
डेंग्यूची प्रमुख लक्षणं
डेंग्यूचं प्रामुख्यानं लक्षण हे थंडी वाजून ताप येणं हेच आहे. पण त्यातही डी.एफ. आणि डी.एच.एफ. या दोन प्रकारांची काही वेगवेगळी लक्षणं आढळू शकतात. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावरही याबाबत माहिती देण्यात आली आहे.
साधारणपणे साध्या डेंग्यूची लक्षणं ही अचानक आलेला ताप, डोकेदुखी, अंगदुखी त्याचबरोबर हाडं आणि प्रामुख्यानं सांध्यांमध्ये वेदना होणं अशा प्रकारची असतात.
WORLD MOSQUITO PROGRAMMEडासांच्या माध्यमातून अनेक आजार पसरतात
तर दुसऱ्या प्रकारच्या संसर्गाची लक्षणं ही, सुरुवातीला साध्या डेंग्यूप्रमाणेच असतात. मात्र त्यानंतर शरिरावर पुरळ येणं, नाकातून किंवा दातातून, लघवीद्वारे अशी लक्षणं दिसल्यास हा प्रकार गंभीर आहे, असं समजावं.
उपचार आणि काळजी
डेंग्यूवर ठरावीक असे उपचार किंवा औषध उपलब्ध नाही. पण लवकरात लवकर निदान झाल्यास आणि वेळीच उपचार मिळाल्यास यावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं असं डॉ. भोंडवे म्हणाले.
उपचार करताना रुग्णाला लक्षणानुसार औषधं दिली जातात. ताप किंवा अंगदुखी अशा आजारावर औषधं दिली जातात. त्याशिवाय जर स्थिती गंभीर झाली असेल, तर रुग्णालयात दाखलही करण्याची गरज भासू शकते.
त्याशिवाय रुग्णाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं.
“डेंग्यूच्या रुग्णाला विश्रांती ही सर्वांत गरजेची असते. तसंच भरपूर पाणी पिणं म्हणजे अंदाजे दिवसाला तीन लीटर पाणी प्यायला हवं. तसंच रुग्णानं साधा आहार घ्यावा.”
रक्तस्त्रावी तापाचा धोका
डेंग्यूचा गंभीर प्रकार म्हणजे डी.एच.एफ किंवा रक्तस्त्रावी ताप हा असतो. साधारणपणे डेंग्यूचा आजार हा 3 ते 8 दिवसांत दिवसांत बरा होत असतो.
मात्र, यापेक्षा जास्त कालावधीसाठी आजार वाढल्यास त्याचे गंभीर परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता डॉ. भोंडवे यांनी बोलून दाखवली आहे.
डेंग्यूचं रुपांतर रक्तस्त्रावी (हिमोरेजिक) तापात झाल्यास रुग्णाच्या लघवीद्वारे किंवा अंतर्गत अवयवांमध्ये रक्तस्त्राव व्हायला सुरुवात होत असते.
या सर्वांचा परिणाम रुग्णाच्या मेंदू, फुफ्फुस किंवा किडनीसारख्या अवयवांवर झाल्यास ते अवयव निकामी होऊन रुग्ण दगावण्याची शक्यता वाढते, असं डॉ. भोंडवे म्हणाले.
प्लेटलेट्सचं प्रमाण महत्त्वाचं
डेंग्यूच्या आजारामध्ये येणाऱ्या तापामुळं शरिरातील प्लेटलेट्सचं प्रमाण हे कमी होत असतं. मात्र हे प्रमाण फार कमी होऊ नये यासाठी यावर लक्ष ठेवणं गरजेचं असतं.
साधारणपणे एक घन मिलीलीटर रक्तामध्ये 1.5 लाख ते 4.5 लाख प्लेटलेट्स एवढं प्रमाण असणं गरजेचं असतं. मात्र डेंग्यूमध्ये हे प्रमाण कमी होत असतं.
प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात आहे किंवा नाही, याची काळजी घेण्यासाठी वारंवार तपासणी करून खात्री करून घेणं गरजेचं असतं.
रक्तातील प्लेटलेट्सचं हे प्रमाण 10 हजारांच्या खाली आल्यास, रुग्णाला बाहेरून प्लेटलेट्स देणं गरजेचं ठरतं, असं डॉ. भोंडवे यांनी सांगितलं.
डेंग्यूच्या अळींचा अटकाव
डेंग्यूचा संसर्ग पसरवणाऱ्या अळ्या किंवा एडिस इजिप्ती प्रजातींचे डास तयार होऊ नये, यासाठी काळजी घेणंही गरजेचं आहे. त्यासाठी स्वच्छता असणं हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहे.
डेंग्यूच्या अळ्या या स्वच्छ आणि साचलेल्या पाण्यात तयार होतात, हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळं घरात एसी, फ्रीजखाली साचलेलं पाणी, फुलदाण्या, शोभेची झाडं याकडं विशेष लक्ष ठेवणं आणि त्याठिकाणी पाणी खूप दिवस जमा न होऊ देणं गरजेचं ठरतं.
डेंग्यू टाळण्यासाठी स्वच्छता पाळणे फार आवश्यक आहे.
त्याचबरोबर आपल्या घराच्या आसपासच्या परिसरातही खड्डे किंवा इतर ठिकाणी पावसाचे पाणी साचलेले नसेल याची दक्षता घ्यावी. घराच्या टेरेसवर जुन्या वस्तू, टायर याठिकाणी हमखास अशाप्रकारचे डास तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळं त्याची काळजी घ्यावी.
डेंग्यूच्या विषाणूचे 1, 2, 3, 4 असे चार प्रकार आहेत. त्यामुळं एकदा होऊन गेला असला तरी डेंग्यू पुन्हा होऊ शकतो अशी शक्यताही डॉ. भोंडवे यांनी बोलून दाखवली.
एका आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी सुमारे 25 हजार जणांचा डेंग्यूमुळं मृत्यू होतो.
डेंग्यूमुळं मलेरियाएवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होत नाही. पण त्यामुळं आजारपण प्रचंड वाढते आणि अनेक समस्या उद्भवतात, अशी माहिती जागतिक डास उपक्रमाचे प्राध्यापक कॅमरॉन सिमन्स यांनी दिली.
जागतिक आरोग्य संघटना (WHO)च्या माहितीनुसार डेंग्यूच्या रुग्णांमध्ये गेल्या 50 वर्षांमध्ये जवळपास 30 पटींनी वाढ झाली आहे. जगभरात दरवर्षी जवळपास 39 कोटी नागरिकांना डेंग्यूची लागण होत असावी असा अंदाज आहे. विशेष म्हणजे यापैकी 70 टक्के प्रकरणं आशिया खंडातली असतात.