गोंदिया जिल्ह्यात पुन्हा लम्पी स्कीनचा प्रसार, तीन जनावरं दगावली, शेतकरी चिंतेत
गोंदिया: संपूर्ण देशाबरोबरच महाराष्ट्रातही थैमान घातलेल्या लम्पी स्कीनच्या आजारानं पुन्हा डोकं वर काढलं आहे.
गोंदिया (Gondia) जिल्ह्यात अनेक ठिकाणी जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे. लम्पी स्कीनमुळं एक महिन्यात चिखली येथील तीन जनावरे दगावली आहेत. त्यामुळं गोदिंया जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत.
लम्पी आजाराचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण
लम्पी स्कीन आजार आटोक्यात आला असे वाटत असतानाच या आजाराने आता पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. चिखली येथील तीन जनावरे लम्पीने दगावली आहेत. अनेक जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. त्यामुळं पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. मागील वर्षी संपूर्ण राज्यभरात जनावरांवर लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाला होता. मोठ्या प्रमाणावर जनावरे देखील दगावली होती. लम्पी आजाराचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर जनावरांचे लसीकरण करण्यात आले होते. लम्पी आजार आटोक्यात आला असे वाटत असतानाच ग्रामीण भागात हा आजार पुन्हा वाढू लागला आहे. लम्पीचा धोका वाढत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. लसीकरणाचा धोका टाळण्यासाठी लसीकरणावर भर देणं गरजेचं आहे.
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
सध्या शेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांचे अर्थकारण जनावरांवर अवलंबून आहे. लम्पी आजार झपाट्याने पसरत असून, जनावरे दगावण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे चिखली आणि परिसरातील नवेगाव राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन वन क्षेत्रालगत बफर क्षेत्रात पाळीव जनावरांबरोबरच वन्य जिवांनाही लम्पी आजाराची लागण होऊ नये म्हणून लसीकरणाची गरज आहे. बाधित आढळून आलेल्या जनावरांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. त्या जनावरांना विलगीकरण केलं पाहिजे, जेणेकरुन ते इतर जनावरांच्या संपर्कात येणार नाहीत. या जनावरांना चारा आणि पाण्याची स्वतंत्र व्यवस्था केली पाहिजे. लम्पीची जनावरांना लागण झाल्यावर तात्काळ परिसरातील पशुसंवर्धन विभागाला याबाबत माहिती दिली पाहिजे. सोबतच बाधित जनावरांवर पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन उपचार केले पाहिजेत.
लम्पीवर त्वरीत उपचार केल्यास जनावरांना धोका नाही
लम्पी चर्म रोग हा पशुधानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी तो त्वरित उपचार सुरू केल्यास निश्चितपणे बरा होतो. या रोगाने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळं घाबरुन जाऊ नये, तसेच मदतीसाठी पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र. 1800-2330-418 अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. 1962 तत्काळ संपर्क साधावा.