क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर : प्राध्यापक होलेंच्या मद्यपानाचा कुटुंबियांना धक्का; हत्येचे गूढ कायम


प्राध्यापक होले यांच्या हत्येला चार दिवसांचा कालावधी उलटला. मात्र, हल्लेखोर अद्यापि पसार आहेत. हल्लेखोरांचे धागेदोरे मिळत नसल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, होले यांनी मद्यपान केले होते, हे ऐकून कुटुंबियांना ‘धक्का’ बसल्याची माहिती सूत्रांनी दिली. श्रीरामपूर येथील प्रा.शिवाजी किसन ऊर्फ देवा होले (रा.जाधव पेट्रोल पंपाजवळ, कल्याण रोड, नगर) यांची गुरुवारी (दि.23) गावठी कट्ट्यातून गोळी झाडून हत्या करण्यात आली.होले हे श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या आरबीएनबी येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. होले यांचे मित्र व नातेवाईक अरुण नाथा शिंदे (रा.नेप्ती, ता.नगर) यांच्या पुतणीच्या कार्यक्रमासाठी नेप्तीला गेले होते. हळद आटोपल्यानंतर होले व शिंदे दोघेही हॉटेल के-9 जवळ मद्यपान करीत अंधारात बसले होते. त्या ठिकाणी आलेल्या तिघांनी पैशांची मागणी करत शिंदे यांना चाकूच्या धाकावर लूटले.

होले तेथून पळून जात असताना त्यातील एकाने गावठी कट्ट्यातून गोळी झाडून होलेंना ठार मारले. या घटनेची फिर्याद कोतवाली पोलिसांत अरुण शिंदे यांनी दिली आहे. पोलिसांनी खुनाचा व लूटीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, यामागे लूटीचे कारण नसून दुसरे कारण असल्याची चर्चा पहिल्या दिवसापासून सुरू आहे.

त्याला कारण म्हणजे हालेंच्या बोटातील सोन्याची अंगठी, जवळील पाकीट व मनगटी घड्याळ घेऊन जाताच हल्लेखोर पळून गेले. दरम्यान, होले मद्यपान करत असल्याचे नातेवाईक वा कुटुंबियांना यापूर्वी कधी लक्षात आले नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. त्यामुळे कुटुंबियांना धक्का बसला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा, कोतवाली, नगर तालुका पोलिसांची पथके गुन्ह्याच्या तपासात कार्यरत आहेत.

सीसीटीव्ही घेतले ताब्यात
तपासासाठी केडगाव बायपास रस्त्यावरील हॉटेल्स व इतर ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजचाही आधार पोलिस घेत आहेत. होले व त्यांचे मित्र शिंदे दोघेही दारुचे पार्सल घेऊन येताना फुटेजमध्ये दिसत आहेत. मात्र, हल्लेखोर कोठेही फुटेजमध्ये आढळले नाही. त्यामुळे त्यांची ओळख सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांना पटली नसल्याची माहिती आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button