तब्बल पावणेसहा टन गुटख्यासह कंटेनर पकडण्याची मोठी कारवाई; कर्नाटकचे दोघे तस्कर गजाआड
कराड ते मसूर रस्त्यावर यशवंतनगरमध्ये बेकायदेशीर गुटखा व कंटेनरसह १ कोटी १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्याची पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई कराड तालुक्यातील तळबीड पोलिसांनी यशस्वी केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी, की आयशर ट्रकमधून कर्नाटक राज्यातून बेकायदेशीर गुटख्याची वाहतूक होणार असल्याची खबरीकडून माहिती मिळाल्याने तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, फौजदार गोपीचंद बाकले व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकाने कराड – मसूर रस्त्यावर रात्रीच्या वेळी निगराणी करून सदर गुटखा वाहून नेणारे वाहन ताब्यात घेतले.
यावरील चालकाला त्याचे नाव, गाव, पत्ता विचारला असता त्याने मोहम्मद ताजुद्दीन सैफुनसाब बालवाले राहणार बिदर, जि. गुलबर्गा – कर्नाटक येथील असून, कंटेनरमध्ये कोंबडी खाद्य असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांना वाहनात गुटखाच असल्याची खात्री असल्याने त्यांनी दोन पंचांना बोलावून घेऊन कंटेनरची तपासणी केली असता त्यात तब्बल ८३ लाख ९ हजार २९६ रुपये किमतीचा ५ टन ७४४ किलो वजनाचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा मिळून आला. तसेच कंटेनर किंमत ३० लाख असा एकूण १ कोटी १३ लाख ९ हजार २९६ रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर, ही तस्करी करणारे महंमद ताजुद्दीन बालवाले व मेहबूब बाबुमिया (रा. बिदर, जि. गुलबर्गा – कर्नाटक) यांना गजाआड करीत त्यांच्याविरुद्ध तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे करीत आहेत. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर, पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील यांनी तळबीड पोलिसांचे अभिनंदन केले आहे.