बाळंतपणासाठी माहेरी गेलेल्या पत्नीच्या भेटीला जाणाऱ्या युवकाचा अपघातात मृत्यू

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

जिंतुर – जालना महामार्गावर चारठाणा येथील एका पेट्रोल पंपाजवळ दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या ३२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, बाळंतपणासाठी माहेरी गेलेल्या पत्नीच्या भेटीला जाताना हा अपघात घडला आहे.

मयत युवक हा सेलुचा रहिवाशी असून अशोक रावसाहेब अंभुरे असे त्याचे नाव आहे. (एमएच.२० ए.डब्ल्यू १७९९) या दुचाकीवरून अशोक हा सेलुतून जिंतुर तालुक्यातील केर्हाळ येथे बाळंतपणासाठी माहेरी गेलेल्या पत्नीस भेटण्यासाठी जात होता. दरम्यान, चारठाणा गावाजवळील एका पेट्रोल पंपाजवळ त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अपघातात मयताच्या डोक्यास, छातीस गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्राव अधिक झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा कयास बांधला जात आहे. अपघातानंतर जवळच असलेल्या सरस्वती हाॅटेलचे मालक दिनकरराव गोरे व मुज्जमिल बशीरखाॅ पठाण हे तातडीने मदतीसाठी धावले. त्यांनी अपघाताची माहिती चारठाण्याचे सरपंच अनिरुद्ध चव्हाण व चारठाणा ठाण्याला देऊन प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका पाठविण्यास सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड, रामकिशन कोंडरे, सरपंच अनिरुद्ध चव्हाण, दिनकरराव गोरे, मुज्जमिल पठाण, भारत खाडे यांनी घटनास्थळी रुग्णवाहिकेत सदर युवकास टाकण्यास मदत केली. चारठाणा केंद्राच्या रुग्णवाहिकेतून संबधित युवकास गंभीर अवस्थेत चालक शेख इसाकोद्दीन यांनी तातडीने जिंतुरच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले. तेथे वैद्यकीय अधिकारी डाॅ. गजानन काळे यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. जिंतुरचे सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात,व अलीम शेख यांनीही मदत केल्याचे मयताच्या नातेवाईकांनी सांगितले.

मोबाईलवर पत्नीचा फोन
अपघात घडल्यानंतर मयत युवकाच्या मोबाईलवर अनेकांचे फोन येत होते. दरम्यान, दिनकरराव गोरे यांनी फोन उचलला असता योगायोगाने तो फोन मयत युवकाच्या पत्नीचा होता. या अपघाताची माहिती दिनकर गोरे यांनी मयताच्या पत्नीस दिली असता मयताच्या पत्नीने जिंतुर रुग्णालय जवळ असल्याने सदर इसमास जिंतुरच्या रुग्णालयात हलवावे, असे दिनकर गोरे यांना सांगितले.

मयत होता शाळेच्या वाहनावर चालक
मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास चारठाणा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद साने, रामकिशन कोंडरे, अमृत शिराळे यांनी जिंतुर ग्रामीण रुग्णालयात जाऊन घटनेचा पंचनामा केला असून मयत युवकाचे शवविच्छेदन करुन त्याचे प्रेत नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मयताच्या पश्चात पत्नी, एक दोन वर्षाचा मुलगा आहे. दरम्यान, सदर युवक हा माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्या सेलु येथील पोदार शाळेच्या गाडीवर चालक म्हणुन कार्यरत होता.