मध्यप्रदेशाच्या आदिवासी 28 महिला पुरुषासोबत 18 बालकांची वेठबिगारीतून मुक्तता
मध्यप्रदेशाच्या आदिवासी 28 महिला पुरुषासोबत 18 बालकांची वेठबिगारीतून मुक्तता
गेवराई : गेवराई तालुक्यातील टाकरवन या ठिकाणाहून मध्यप्रदेशामधील बडवानी जिल्ह्यातील आदिवासी 28 महिला पुरुषासह 18 लहान बालकांची ऊसतोड मजूर म्हणून आणलेल्या कामगारांची ऊसतोड मुकादमाच्या कचाट्यातून काल दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बीड, बांधकाम कामगार कार्यालय बीड, गेवराई तहसील कार्यालय, गेवराई पोलीस स्टेशन मानवी हक्क अभियान संघटनेचे प्रदेश सचिव तथा महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष कडुदास कांबळे या सर्वांच्या अथक परिश्रमानंतर सुटका करण्यात आली.
गोपीनाथ पवार या ऊसतोड मुकादमाने कर्नाटक येथील बडवानी जिल्ह्यातील आदिवासी मजुरांना ऊस तोडीच्या कामासाठी तीन महिन्याचा करार करून, प्रत्येक जोडीस (कोयत्यास) 40 हजार रुपये प्रमाणे उचल देऊन कामाला आणले होते. कर्नाटक येथील कारखान्याचा पट्टा पडल्यानंतर ऊसतोड कामगारांनी मध्यप्रदेश मधील त्यांच्या गावी जाण्यास मुकादामाकडे आग्रह धरला आणि कामाचा हिशोब मागितला. ऊसतोड मुकादमाने या मजुरांचा कामाचा हिशोब दिला तर नाहीच उलट या लोकांना पुन्हा बीड जिल्ह्यात टाकरवन शिवारामध्ये ऊस तोडीच्या कामासाठी बळजबरीने लावले. त्यांना या मुकादमाने कामास लावून जवळपास पाच महिने होत आलेले आहेत.
ऊसतोड मुकादमाने आंतरराष्ट्रीय मजूर स्थलांतर कायदा 1979 चे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये कामास आणून त्यांच्याकडून बळजबरीने कमी मोबदला देऊन काम करून घेतले आहे. असे असतानाही ऊसतोड मुकादमाने या मजुरांना गावी जाण्यासाठी कोणतीही गाडीची आणि जेवण्याची व्यवस्था केली नाही.
अखेर कामगार उपायुक्त बीड मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे कार्यालयीन कर्मचारी, गेवराई तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार जाधवर साहेब, गेवराई तहसील कार्यालयाचे खेडकर साहेब आणि सामाजिक कार्यकर्ते कडूदास कांबळे यांनी या लोकांची जेवण्याची आणि त्यांना गावी जाण्याची व्यवस्था करून त्यांच्या मुलाबाळांना गावी सुखरूप पोहोचविले.