राज्यभरातील शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींमध्ये संतापाची लाट राज्यभरातील संतप्त शिवसैनिक ‘मातोश्री’वर
‘शिवसेना आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची,’ ‘आवाज कुणाचा, शिवसेनेचा,’ ‘उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ या घोषणांनी आज कलानगर परिसर दणाणून गेला होता. शिवसेना आणि धनुष्यबाण चोरणारे आणि त्यांच्या मालकाविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत होता.
‘मातोश्री’बाहेर हजारो शिवसैनिकांचे मोहोळ उठले होते… जणू महाशिवरात्रदिनी महादेवाने तिसरा डोळाच उघडला होता!
निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राज्यभरातील शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शुक्रवारपासूनच राज्यभरातील संतप्त शिवसैनिक ‘मातोश्री’वर येत आहेत. आज तर हजारो शिवसैनिक ‘मातोश्री’बाहेर जमा झाले. यामध्ये महिला रणरागिणींची संख्या लक्षणीय होती. भगवे ध्वज खांद्यावर घेऊन येणारा हा भगवा अंगारच होता. ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना नेते व प्रमुख पदाधिकाऱयांची बैठक घेत होते, त्याचवेळी बाहेर शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी सुरू होती. ‘शिवसेना अंगार, बाकी सब भंगार है,’ ‘हमसे जो टकरायेगा, मिट्टी में मिल जायेगा’ यासारख्या घोषणांनी संपूर्ण कलानगर दणाणून गेले होते.
जय जय महाराष्ट्र माझा!
n शिवसैनिकांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत सामूहिकरीत्या गाण्यास सुरुवात केली. ‘अस्मानीच्या सुलतानीला जवाब देती जिव्हा…’ हे कडवे गाताना तर शिवसैनिकांचा आवाज टिपेला पोहचला. त्यानंतर थोडय़ाच वेळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बाहेर आले आणि कलानगर जंक्शन येथे जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधला. तेव्हा आसमंतात निनादला पुन्हा एकदा ‘शिवसेना आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची’चा जयघोष!
तेजस ठाकरे आघाडीवर
‘मातोश्री’बाहेर शिवसैनिकांची गर्दी वाढू लागली होती. या गर्दीत शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून उभे होते ते तेजस ठाकरे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जेव्हा गाडीच्या टपावरून भाषण देत होते तेव्हा गाडीच्या बाजूला पूर्णवेळ तेजस ठाकरे उभे होते.