महागाईचा कळस गॅस सिलिंडर 10,000 रुपये,पेट्रोल 225 रुपये, डिझेल180 रुपये प्रतिलिटर
ईस्लामाबाद : भारताविरुद्ध कुरापती करणार्या पाकिस्तानने जनतेच्या दैनंदिन गरजांपेक्षा अण्वस्त्रनिर्मिती आणि शस्त्रास्त्र खरेदीवर भर दिला.
देशाची तिजोरी रिकामी केली. परिणामी, कर्जाचा डोंगर उभा राहिल्याने आज तो देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आले. महागाई गगनाला भिडल्याने सामान्य जनता रोजच्या गरजा भागवण्यासाठी घायकुतीला आली आहे. तेथे स्वयंपाकाचा गॅस सिलिंडरने दहा हजार रुपयांपर्यंत मजल मारली आहे.
पीठासाठीही तेथे मारामार सुरु झाली आहे. सिंध राज्यातील मीरपूर खास जिल्ह्यात अन्न विभागाने ट्रकभर आणलेली पिठाची पाकिटे पाहून मोठी गर्दी झाली. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका 35 वर्षीय मजुराचा चेंगरून जागीच मृत्यू झाला. शिवाय अनेक जण जखमी झाले. अन्य एका घटनेत शहीद बेनझीराबाद जिल्ह्यातील सकरंद गावात एका पिठाच्या गिरणीबाहेर स्वस्त पीठ खरेदी करताना चेंगराचेंगरी झाली. यात 3 महिलांचा बळी गेला.
महागाईचा दर 25 टक्क्यांजवळ
बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानचा ग्राहक शुल्क निर्देशांक 24.5 टक्के झाला आहे. पाकिस्तानच्या आधीच्या आकडेवारीनुसार एक वर्षाआधी याच काळात हा आकडा 12.28 टक्के होता. पाकिस्तानच्या ग्राहक शुल्क निर्देशांकाध्ये दरवर्षी वाढ होताना दिसत आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला अपयश येत असून ही बाब सरकारनेही मान्य केली आहे. भाज्यांच्या किमतीदेखील गगनाला भिडल्या आहेत. बटाटे 60 रुपये तर कांदे दोनशे रुपये किलो भावाने विकले जात आहेत. भेंडी, कॉलिफ्लॉवर, कोबी, फरसबी, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, आले, मुळा यासारख्या भाज्या खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नाही. ही वाढ थांबायचे नावच घ्यायला तयार नाही.
परकीय गंगाजळीचा खडखडाट
जीवनावश्यक वस्तू, औषधे आणि इंधनाची आयात केवळ पंधरा दिवसच करता येईल एवढा अल्प परकीय चलनाचा साठा पाकिस्तानच्या तिजोरीत उरला आहे. ही रक्कम 6.6 बिलियन अमेरिकन डॉलर्स आहे. त्याखेरीज पाकच्या डोक्यावर 126.9 बिलियन डॉलर्स कर्जाचा डोंगर आहे. या कर्जाचे हप्ते कसे भरायचे असा यक्षप्रश्न त्या देशापुढे निर्माण झाला आहे. त्यामुळेच पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि नवे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना कटोरा घेऊन सौदी अरेबिया, अमेरिका, चीन, जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे कर्जाची याचना करावी लागत आहे.
महागाईचा कळस
कांदे 200 रुपये प्रतिकिलो, चिकन 650 रुपये प्रतिकिलो, गॅस सिलिंडर 10,000 रुपये, गव्हाचे पीठ 150 रुपये प्र. कि., साखर 100 रुपये प्रतिकिलो मैदा 135 रुपये प्रतिकिलो, रवा 120 रुपये प्रतिकिलो, बेसन 165 रुपये प्रतिकिलो, गूळ 120 रुपये प्रतिकिलो, दूध 160 रुपये प्रति लिटर, तांदूळ 150 रुपये प्रतिकिलो, अंडी प्रति डझन 400 रुपये, मटण 1100 रुपये प्रतिकिलो, खाद्यतेल 480 रुपये प्रतिकिलो, डाळी 280 रुपये प्रतिकिलो.
पेट्रोल, डिझेल कडाडले
पेट्रोलची किंमत 225 रुपये प्रतिलिटर असून डिझेलची किंमत 180 रुपये झाली आहे. तसेच सीएनजीची किंमत प्रतिकिलो 195 रुपयांवर गेली आहे.