ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेराजकीय

जनार्दन रेड्डी यांची भाजपाला सोडचिठ्ठी देत नव्या पक्षाची घोषणा


बंगळुरू : कर्नाटकमध्ये नव्या वर्षाच्या मध्यावर विधानसभेची निवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुकीपूर्वी राज्यात सत्ताधारी भाजपाला मोठा धक्का बसला आहे.
कर्नाटक सरकारमधील माजी मंत्री आणि खाणव्यावसायिक जी. जनार्दन रेड्डी यांनी आज भाजपाला सोडचिठ्ठी देत नव्या पक्षाची घोषणा केली आहे. जनार्दन रेड्डी यांनी भाजपाशी असलेलं दोन दशकांचं नातं तोडताना कल्याण राज्य प्रगती पक्ष नावाचा पक्ष स्थापन केला आहे.

रेड्डी बंधूंचा बालेकिल्ला असलेल्या बेल्लारी जिल्ह्याच्या बाहेरून कर्नाटकच्या राजकारणात प्रवेश करताना आपण कोप्पल जिल्ह्यातीली गंगावती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जनार्दन रेड्डी यांनी जाहीर केले आहे. ते म्हणाले की, आज मी कल्याण राज्य प्रगती पक्षाची घोषणा करत आहे. हा पक्ष माझ्या विचारांसह बासवण्णा यांचे विचार घेऊन पुढे जाईल. हा पक्ष धर्म आणि जाती आणि फुटीरतावादी राजकारणाविरोधात आहे.

पुढच्या काळात आपण आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभर यात्रा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. २०१८ मध्ये झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीवेळी भाजपाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना भाजपाचं जनार्दन रेड्डींशी कुठलंही देणंघेणं नसल्याचं सांगितलं होतं.

दरम्यान, रेड्डी म्हणाले की, मी गंगावतीमध्ये एक घर बांधलं आहे. तसेच तेथील मतदार यादीत माझ्या नावाची नोंद केली आहे. मी आता तिथूनच निवडणूक लढवणार आहे. कोट्यवधी रुपयांच्या अवैध खाणकाम प्रकरणी रेड्डी हे २०१५ पासून जामिनावर आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात त्यांच्यावर अनेक अटी घातल्या आहेत. त्यामध्ये त्यांच्या कर्नाटकमधील बेल्लारी आणि आंध्र प्रदेशमधील कडप्पा जिल्ह्यात जाण्यास मनाई आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button