शेत-शिवार

भेंडीचे ‘हे’ वाण उन्हाळी हंगामात देतील भरघोस उत्पादन


भाजीपाला पिकामध्ये प्रामुख्याने वांगी, मिरची इत्यादी भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. परंतु त्या खालोखाल भेंडीची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव करतात. भेंडी हे भाजीपाला पिकामध्ये शेतकरी बंधूंना चांगले आर्थिक उत्पादन देणारे पीक असून या पिकाच्या माध्यमातून शेतकरी बंधू कमीत कमी खर्चामध्ये व कमीत कमी वेळात उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या माध्यमातून खूप चांगला आर्थिक नफा मिळवू शकतात.



भेंडी किंवा इतर पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी व्यवस्थापन जितके गरजेचे आहे तितकेच भेंडीचे चांगल्या उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. जर आपण सगळ्या पद्धतीचे व्यवस्थापन अचूक ठेवले परंतु भेंडीच्या लागवडीसाठी जातींची निवड करताना चूक केली तर सगळ्या प्रकारचे कष्ट पाण्यात जाण्याची शक्यता असते व मोठा आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे या लेखांमध्ये आपण भेंडीच्या काही महत्त्वाच्या व महाराष्ट्रासाठी शिफारशीत केलेल्या काही जातींची माहिती घेऊ.
महाराष्ट्रासाठी शिफारस केलेल्या भेंडीच्या जाती

1- फुले विमुक्ता– महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेश खिंड, पुणे या ठिकाणाहून हा वाण विकसित करण्यात आला असून हा भेंडीचा वाण लवकर काढणीस येणारा वाण आहे. जर फुले विमुक्त जातीच्या भेंडीची लागवड केली तर हेक्‍टरी 200 क्विंटलच्या पुढे उत्पादन मिळणे शक्य आहे.
या जातीपासून मिळणारी भेंडी ही दर्जेदार असते व तिची प्रत चांगली असते. महत्वाचे म्हणजे व्हायरस रोगास ही जात प्रतिकारक असून या रोगास बळी पडत नाही. या जातीची भेंडी हिरवी, सरळ व आकर्षक असते व खूप चांगल्या प्रतीचे असते व बाजारभाव देखील चांगला मिळतो.

2- फुले उत्कर्षा– ही जात देखील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून सन 2003 मध्ये लागवडीसाठी शिफारस करण्यात आली असून शेतकरी बांधवांसाठी भेंडी लागवडीस खूप चांगला असा हा वाण आहे. या जातीपासून मिळणारी भेंडी हिरवी, सरळ व आकर्षक असते तसेच लांबीला आठ ते दहा सेंटीमीटर व निमुळती असते.

फुले उत्कर्षा जात ही हळद्या रोगास कमी प्रमाणात बळी पडते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका हेक्टर मध्ये सरासरी 150 ते 200 क्विंटल पर्यंत उत्पादन या जातीपासून मिळू शकते. या जातीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही भेंडीची जात खरीप व उन्हाळी लागवडीसाठी योग्य आहे.

3- परभणी क्रांती– भेंडीची ही जात देखील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची असून ही जात मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केली असून भेंडीच्या पुसा सावनी जातीपेक्षा कणखर व केवडा या विषाणूजन्य रोगाला अधिक प्रमाणात प्रतिकारक अशी जात आहे. परभणी क्रांती जातीची भेंडी लवकर काढणीस येते.

म्हणजे एकंदरीत लागवडीपासून 50 ते 55 दिवसात भेंडी तोडणीला येते. या जातीची भेंडी कोवळी, हिरवी व आकाराने निमुळती आणि लांबीने सात ते दहा सेंटीमीटर असते. परंतु साठवणुकीत लवकर नरम अर्थात मऊ पडते. परभणी क्रांती जातीपासून हेक्‍टरी सरासरी 120 ते 140 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button