‘या’ कंपनीचे कफ सिरप धोकादायक, WHO कडून मेडिकल अलर्ट जारी
भारतातील मेडेन फार्मास्युटिकल्स या कंपनीने बनवलेल्या खोकला आणि सर्दीवरील सिरपबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून म्हणजेच WHO कडून एक मेडिकल अलर्ट जारी करण्यात आले आहे. द गॅम्बियामध्ये झालेल्या 66 मुलांच्या मृत्यूनंतर हा अलर्ट जारी करण्यात आला. यानंतर WHO ने या औषधाची चाचणी केली असता मेडेन फार्मास्युटिकल्सच्या खोकला आणि सर्दी सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलची मोठ्या प्रमाणात मात्रा आढळून आली. ज्यामुळे लोकांना याचा त्रास झाला.
चार उत्पादनांचे नमुने तपासण्यात आले
ज्या चार उत्पादनांच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली त्यात मेडेन फार्मास्युटिकल लिमिटेड ऑफ इंडियाने बनवलेले खोकला आणि कोल्ड सिरपचा समावेश आहे. यानंतर आरोग्य संघटनेने रुग्णांना अधिक त्रास होऊ नये म्हणून सर्व देशांमध्ये अशी उत्पादने शोधून काढून टाकण्याची शिफारस केली आहे. हे सिरप प्यायल्यामुळे या 66 मुलांना आपला जीव गमवावा लागला अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे WHO महासंचालक टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस यांनी दिली आहे.
औषधातील या विषारी घटकामुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब, मूत्रमार्गात अडथळा, डोकेदुखी, मेंदू आणि किडनीवर परिणाम होतो. संबंधित देशाच्या अधिकार्यांकडून पूर्ण चौकशी होईपर्यंत या औषधांचा वापर करू नये, असे जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO)सांगण्यात आले आहे. यामुळे इतर जीवघेणे आजार होण्याची शक्यता आहे.